केंद्रात तुरटीचा तुटवडा : नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्हभंडारा : येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील आठ दिवसांपासून तुरटीअभावी दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला विद्युतभार नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. वस्तुमान वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. त्यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते.येथील जलशुद्धीकरण केंद्रात फाऊंटेनवर तुरटी लावली जाते. त्यातून पाणी शुद्ध होऊन त्यानंतर पाण्यावर उर्वरित प्रक्रिया केली जाते. परंतु, मागील आठ दिवसांपासून तुरटी संपल्याने पाणी शुद्ध होत नाही. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सव्वा लाख लोकसंख्येच्या शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिकेची आहे. नगर पालिकेची पाणी व मालमत्ता करवसुली सक्तीने सुरू आहे. कर भरण्यासाठी नागरिकांना मीटर काढून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. परिणामी कर वसुली मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. दुसरीकडे, कर भरूनही नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये पालिकेप्रती संताप व्यक्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील तुरटीचे गोदाम रिकामे आहेत. वर्षभरासाठी लागणाऱ्या तुरटीची निविदा काढून ते संबंधित एजन्सीला देण्यात आले. मात्र सदर एजन्सीकडून साहित्याचा पुरवठा बंद आहे. तरीसुद्धा या साहित्याचे देयक मात्र दर महिन्याला काढले जात आहे? संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसातून तीनदा जलकुंभ भरावा लागत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण न करताच नदीतून ओढलेले पाणी जलकुंभात चढविले जात आहे. आणि तेच पाणी नळाद्वारे सोडण्यात येत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दूषित पाण्याचे बील का भरायचे? -सूर्यकांत ईलमेदूषित पाणी पुरवठा होण्याला नगर परिषदेचे उदासीन धोरण कारणीभूत ठरत आहे. दूषित पाण्याचा पुरवठा करूनही पिण्याच्या पाण्याचे कर वसुल करण्यात येत आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या दृष्टिने ‘आरओ’ संच बसवून घेण्याची वेळ आली आहे. आहे. आरओ खरेदीचा नाहक खर्च नळधारकांना सोसावा लागत आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा कर द्यायचे कशाला? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख सूर्यकांत ईलमे यांनी केला आहे.
जलशुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा
By admin | Published: April 05, 2017 12:19 AM