दिघोरीतील प्रकार : निधीसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडेदिघोरी/मोठी : येथील गावतलावात विषारी वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरली असल्याने तलावाचे संपुर्ण पाणी हे गढूळ झाले आहे. यामुळे या तलावात डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तलावाच्या सभोवताल दाट लोकवस्ती असल्याने परिसरातील सर्व जनतेला डासांचा खुप त्रास सहन करावा लगतो शिवाय निरनिराळ्या आजारांची लागण परिसरातील जनतेला होत आहे. गाव तलाव स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायतीला सांगितले याची दखल घेत ग्रामपंचायतीने ३० नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेवून तलाव स्वच्छ करण्याचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालय येथे १७ डिसेंबर २०१५ ला पाठविला. अजुनपर्यंत गाव तलाव गट क्रमांक १३८० स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्याल्यामार्फत कोणताही निधी मंजूर करण्यात आलेला नाही. या तलावाच्या लोकवर्गणीतून ग्रामपंचायत २५ टक्के निधी भरण्यास तयार असूनसुध्दा या ठरावाची अजूनपर्यंत दखल घेण्यात आलेली नाही. येथील गावतलावाचा पाण्याचा वापर शेतीला सिचंनासाठी व जनावरांना पिण्यासाठी हात असतो शिवाय इतर बाहेरील उपयोगासाठी पाण्याचा वापर केला जातो. तलावात विषारी वनस्पती वाढल्याने पाणी कोणत्याच उपयोगात आणता येत नाही यासाठी तलावाचे खोलीकरण करुन वनस्पतीचा नायनाट करणे यासाठी भरपूर निधीची आवश्यकता आहे. २५ टक्के निधी ग्रामपंचायत भरायला तयार आहे अशा आशयाचा ठराव जिल्हा प्रशासनाला पाठवून चार महिने लोटले असले तरी कार्यालयामार्फत अजूनही सकारात्मक उत्तर मिळालेले नाही. (वार्ताहर)
गाव तलावाचे पाणी झाले दूषित
By admin | Published: April 06, 2016 12:33 AM