तुमसर : उन्हाळ्यात थंड फळ म्हणून टरबुजाला मोठी मागणी असते. शेतकरी नगदी पीक म्हणून तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात टरबुजाची लागवड करतात. गत एका वर्षापासून कोरोना संक्रमण काळात टरबुजाची शेतीचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. सध्या बाजारपेठा बंद असल्याने शेतात टरबूज पडून आहेत. त्यामुळे सर्व टरबूज खराब होण्याच्या मार्गावर आहेत.
तुमसर तालुक्यात नदीकाठावरील गावात मोठ्या प्रमाणात टरबुजाची शेती करण्यात येते, परंतु गत एका वर्षापासून कोरोना संक्रमण काळात वाढ झाल्याने ही शेती नुकसानीत आली आहे. लॉकडाऊनने बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतातील टरबुजांची कुठे विक्री करावी, असा प्रश्न पडला आहे. टरबुजाची शेती महाग आहे. बी-बियाण्यांपासून ते टरबुजाची वाढ होईपर्यंत शेतकऱ्यांना टरबुजाला हातातील फोडासारखे जपावे लागते. कीड लागू नये, म्हणून अनेक रासायनिक द्रव्यांच्या वापर करावा लागतो. सर्व रासायनिक औषधे महागडी आहेत. सध्या लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांचा निघाला नाही.
कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे स्थानिक प्रशासन व राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे या टरबुजांना बाजारपेठा मिळणे बंद झाले आहे. सध्या शेतामध्ये वेलींना मोठ्या प्रमाणात टरबूज लागले आहेत. उष्णतेमुळे टरबूज काही दिवस असेच राहिले, तर खराब होण्याची दाट शक्यता आहे.
तुमसर तालुक्यातील हवामान टरबुजांसाठी पोषक आहे. त्यामुळे येथील टरबूज गोड व रुचकर लागतात. त्यामुळे भंडारा जिल्ह्यासह छत्तीसगड, विदर्भात मोठी मागणी आहे. लॉकडाऊन लागल्यामुळे मागणी कमी झाली आहे. येथील शेतकरी विक्रेत्याच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने किमान टरबूज विक्रीकरिता काही सवलत देण्याची मागणी डोंगरला येथील प्रगतिशील शेतकरी शंकर राऊत यांनी केली आहे.
कोट
लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहे. सध्या शेतात टरबूज मोठ्या प्रमाणात लागले आहेत. त्यांना त्यांची विक्री कुठे करावी, असा प्रश्न पडला आहे. लागवडीचा खर्चही या वर्षी निघाला नाही. त्यामुळे शासनाने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
शंकर राऊत, शेतकरी, डोंगराला.