अधिकाऱ्यांचे अभय : पर्यावरणाचे संतुलन बिघडलेमोहाडी : वाढत्या शहरीकरणासोबत ग्रामीण भागातील आम्रवृक्षाची कटाई मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून गावागावातील अमराई नष्ट होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. त्यामुळे आम्रवृक्ष तोडीवर त्वरित प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.उन्हाळ्यात आंब्याना महत्व आहे. ऊन लागले असेल, शरीरात उष्णता वाढली असेल तर आंबा अतिशय गुणकारी ठरतो. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. आंब्याचा रस व गव्हाच्या शेवया या तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा पसंतीचा आहार असतो. ग्रामीण भागात आंब्याचा रसासोबत शेवया खाण्याची पध्दत आहे. आंब्याचे लोणचे तार आलेल्या रुग्णाच्या तोंडाला चव येण्यासाठी देतात. एकूणच आंबा दैनंदिन आयुष्यात महत्वाचा घटक आहे. आंब्याचे झाड इतर झाडांपेक्षा उंच व विस्ताराने मोठे असते. उन्हात प्रवास करणाऱ्या वाटसरुंना उन्हाचे चटके कमी करण्यासाठी आंब्याच्या सावलीचा मोठा उपयोग होतो. आंब्याचे झाड उंच असल्याने पावसाळ्यात भिजण्यापासून वाचविण्यासाठी याचा फायदा होतो. हवेने, वादळाने हे झाड पडले तर त्याच्या लाकडाचा सरपणासाठी वापर केला जातो. सद्यस्थितीत काही दलालही आंब्याची झाडे घेत ओहत. शेतकऱ्यांना जादा पैशाचे आमिष दाखवून आंब्याचे वृक्ष मुळापासून तोडून नष्ट करीत आहे. शासन गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे झाडे लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे व निसर्गाचे संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु महसूल विभागच दलालांना आंब्याचे झाडे तोडण्यासाठी परवानगी देत आहे.पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वाचा असलेला फळाचा राजा आंब्याची होत असलेले कत्तल थांबवून तोंडणाऱ्यावर व तोडण्याची परवानगी देणाऱ्या विभागावर कारवाई का होऊ नये असा जनतेचा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)
आंब्याची झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर
By admin | Published: May 27, 2015 12:37 AM