कोरोनाचा प्रादुर्भाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुका प्रशासनाने तुमसर तालुक्यात १४ ते २३ एप्रिलदरम्यान दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित केला. त्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. बाजार बंद असल्याने या भाजीपाल्याची विक्री कुठे करावी? असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात व घरी भाजीपाला पडून आहे. किमान शेतकऱ्यांना दोन ते तीन तास भाजीपाला विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
तुमसर तालुक्यात सिंचनाची सोय असलेले शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये करतात. तालुक्यातील मोठ्या गावात भाजीपाला विक्री करतात. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना भाजीपाला विक्री करता येत नाही. शेतकऱ्यांचा भाजीपाला बांधावर सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्हा प्रशासनाने भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दोन तास दररोज भाजीपाला विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.