लाखनी : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास तीन ते चार दशक ग्रामीण भागातील मंडई मोठ्या जल्लोषात सुरू होत्या. नागरिकांना मंडईचे मोठे आकर्षण होते. अनेक नागरिक मनोरंजनाच्या साधनांचा उपयोग करून जनतेचे ध्यानाकर्षण करायचे. त्यातून त्यांना पैसे मिळत होते. ते पैसे म्हणजे बोजारा समजत होते. काळ बदलला, जुनी पिढी संपुष्ठात आली. मात्र त्यांची जागा नवीन पिढीने घेतली नाही. मनोरंजनात दिवसा पाच ते दहा लोकांचा समूह असायचा, त्याला दंडार म्हणत असायचे. एकेरी व्यक्ती विविध सोंग करायची, त्यांना बहुरुपी म्हणत होते. आज मात्र गावागावातील मंडई जोर असला तरी पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण भागात मंडईचे आयोजन हे विशेष आकर्षण होते. दिवाळीनंतर तिसऱ्या दिवसापासून गावागावात मंडई भरली जात होती. यात भावासाठी बहीण विविध सामान ओवाळणीकरिता घेत होती. आजसुद्धा ती प्रथा आहे. मात्र चार दशकापूर्वी मंडई म्हटल्यानंतर जे आकर्षण असायचे ते आता राहिले नाही. पोवाडा, गणगवळन, टाहारा जो लाकडी असायचा त्याच्यावर एकमेव साधान घालायचे. तुणतुणा वाजायचा, ढोलकी मास्टर आपल्या विशिष्ट शैलीत पाय मटकवून ढोलकीवर दोन्ही बाजूला थाप घालायचा. त्यामुळे ढोलकीच्या तालावर तुणतुण्यााच्या नादाने भारुड, पोवाडा, गणगवळन यांचा तालासुरात आवाज निघायचा, ते गीत-संगीत मोहीत करणारे होते. एकापाठोपाठ समूहाने विविध वेशभुषा घालून लोक नाचायचे. पुरुष-स्त्रीचे वस्त्र परिधान करुन चेहऱ्याला सजवून या गणगवळनमध्ये नाचायचे. समोर सर्कशीतील जोकराप्रमाणे दोन व्यक्त आकर्षित करणारे लाकडी साहित्य घेवून त्याचा आवाज काढायचे. पुरातन काळातील छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव मस्तानी, प्रभु रामचंद्र, यांची गौरवगाथा मांडणारे शाहीर पोवाडे सादर करून सर्वांना मोहीत करायचे. मात्र आज ते सर्व लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मंडईनिमित्त पूर्वी दंडार रात्री आयोजित केली जात होती. त्यावेळी एखादी नाट्यछटा सादर होत होती. हे सर्व नवीन पिढीला आज मान्य नाही. जुने ते सोने समजून त्यांना सहज स्विकारायला पाहिजे मात्र ते चित्र दिसत नाही. नवे ते हवे याच उद्देशाने नवीन पीढीने आपले मनोरंजनाचे साधन निवडले. आता नवीन पिढीला मोबाईल या वस्तुने आकर्षिक केले आहे. केवळ परंपरा सुरूएकंदरित आज ग्रामीण भागात मंडईचे आयोजन केले जाते, त्यामागे ती परंपरा कायम राहावी हाच उद्देश प्रामुख्याने दिसत आहे. सोबत मनोरंजनाकरिता आज गावागावात मंडईनिमित्त नाटकांचे आयोजन केले जाते. मात्र पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक नाटकांचा ऱ्हास झाला नाही. केवळ नावापुरती मंडई राहिली आहे. पुरातन कलाकृतीचा ऱ्हास झाला आहे, हे तेवढेच खरे.
पुरातन कलाकृती ऱ्हास होण्याच्या मार्गावर
By admin | Published: November 30, 2015 12:46 AM