लाखांदूर तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर चूलबंध नदीजवळ असलेल्या आसोला गावाच्या हद्दीत जलसंपदा विभागांतर्गत हवामान केंद्राची स्थापना जून, १९८९ या वर्षी करण्यात आली. हवामान बदल व हवामानाची अचूक माहिती देण्याकरिता लाखाेंचा शासनाचा निधी खर्च करून हवामान यंत्रसामुग्री व कर्मचाऱ्यांकरिता सदनिका बांधकाम करण्यात आले. मात्र, याचा उपयोग तालुक्यातील जनतेला होताना दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे.
लाखांदूर तालुक्यातील आसोला येथे हवामान केंद्रांतर्गत सरीता मापन केंद्र असून, पावसाळ्यात या नदीला आलेल्या पुराची अद्यावत मोजणी करून तशा नोंदी वेळोवेळी संबंधित विभागासह, जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असताना, फक्त संबंधित विभागातील वरिष्ठ कार्यालयास माहिती देत असल्याचे सांगितले आहे. या हवामान केंद्रात दिशादर्शक यंत्र, सूर्यप्रकाश तीव्रता मापकयंत्र, हवेचा वेग, तापमान, पर्जन्यमान आदी तापमान मोजण्याची उपकरणे बसवली आहेत. या यंत्रांद्वारे दररोजची अद्ययावत नोंदी घेऊन नोंदवहीमध्ये माहीती घेतली जाते, परंतु या नोंदीची माहिती तालुक्यातील जनतेला होतच नसल्याने, या हवामान केंद्राचा उपयोग कोणासाठी, असा प्रश्न आहे. सर्वसामान्य लोकांसह शेतकऱ्यांना याचा उपयोग होताना दिसून येत नाही. सध्या दररोज हवामानात बदल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. कधी तापमानात वाढ तर कधी पर्जन्य बदलाचे चित्र बघावयास मिळत आहे, तरीही माहिती दिली जात नाही. केंद्रातून दैनंदिन तापमान व पर्जन्यमानाची नोंदी तालुका प्रशासनास देऊन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला याची दररोज माहिती दिली पाहीजे, परंतु येथील प्रशासनासह येथील जनता या हवामान केंद्राबाबाबत अनभिज्ञता आहे. लाखांदूर तालुक्याचे तापमान व पर्जन्यामान कधीच प्रसिद्ध होत नसल्याचे वास्तव असून, हवामानाची इत्यंभूत माहिती तालुकास्तरावरून दिल्यास, शेतकरी वर्गाला हवामानाचा अंदाज व पूर्वसूचना प्राप्त होऊन संभाव्य होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
बॉक्स :
हवामान केंद्रात कर्मचाऱ्यांची कमीच
लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील हवामान केंद्रात तीन कर्मचाऱ्यांची पदे आहेत. त्यात १ सहायक अभियंता, व दोन मापी खलाशी यांचा समावेश आहे. सन २०१२ पासून येथील सहायक अभियंता पद रिक्त असून, ब्रह्मपुरी येथील कार्यालयातील अभियंत्याकडे येथील पदभार सोपविला आहे. सन २०१७ मध्ये कार्यरत असलेले भोयर नामक मापी खलाशी सेवानिवृत झाल्यामुळे तेही पद रिक्तच असून, सध्या एकच मापी खलाशी असून, संपूर्ण हवामान केंद्राचा कार्यभाग पाहत आहेत.