संजय साठवणे
साकोली : तरुणाईला भुरळ घालणारा प्रेमाचा आठवडा सध्या सुरू असून, विविध डे साजरे करण्यात तरुण-तरुणी मग्न झाले आहेत. कोरोनाच्या सावटातही व्हॅलेंटाइन सप्ताह उत्साहात सुरू असून, विविध वस्तूंनी भंडारा जिल्ह्यातील बाजारपेठ सजली आहे.
दशकापूर्वी महानगरात साजरा होणारा व्हॅलेंटाइन उत्सव आता गावखेड्यांपर्यंतही पोहोचला आहे. संत व्हॅलेंटाइन यांच्या स्मृतीत साजरा केला जाणाऱ्या या दिवसाची तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे. भंडारा शहरासह जिल्ह्यातील तालुका स्तरावरही आता या डे चे फॅड वाढल्याचे दिसत आहे. पाश्चात्य राष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा हा दिवस अलीकडे भारतातही ग्रामीण भागात साजरा होऊ लागला आहे. या सप्ताहाची सुरुवात ७ फेब्रुवारीपासून होते. रोज डे हा या सप्ताहातील पहिला दिवस. गुलाबपुष्प देऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न तरुणाई करतात. ८ फेब्रुवारीला प्रपोज डे, ९ फेब्रुवारीला चाॅकलेट डे, १० फेब्रुवारीला टेडी डे, ११ फेब्रुवारीला प्राॅमीस डे, १२ ला किस डे, १३ ला हग डे आणि १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.
प्रेमी युगुलच नव्हे तर विविध नागरिकही हा दिवस साजरा करीत असल्याचे अलिकडे दिसत आहे. प्रेम करण्यासाठी सगळेच दिवस महत्त्वाचे असले तरी या काळात मात्र याला बहर येतो; परंतु यंदा कोरोना सावटामुळे शाळा - महाविद्यालय बंद असल्याने तेवढा उत्साह दिसत नाही; परंतु शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी फुलल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स
गुलाबपुष्प प्रेमाचे प्रतीक
व्हॅलेंटाइन सप्ताहाचा पहिला मान प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबपुष्पाचा आहे. त्यामुळेच सर्वत्र रोज डे साजरा केला जातो. या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रेमीजीव आपल्या जीवलगासाठी गुलाबी गुलाबपुष्प खरेदी करतात. काही जण पिवळा, पांढरा आणि इतरही रंगाचे गुलाब खरेदी करतात. रंगावरून प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.