आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर शहराला कुबेर नगरीची ओळख ही दर आठवड्याला भरणाऱ्या बाजारामुळे न्युन दर्जा देणारी ठरत आहे. शहरात दर आठवड्याला मंगळवारच्या दिवशी मोठी बाजारपेठ भरते. मात्र त्याच्यामुळे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कुबेर नगरीत आठवडी बाजार भरण्याच्या पर्यायी सुविधेअभावी मुख्य रस्त्यावर बाजाराची अस्थायी दुकाने उभारण्यात येतात.शहरातील प्रमुख रस्त्यावर आठवडी बाजार प्रत्येक मंगळवारला भरतो. शहराची लोकसंख्या त्यात तुमसरला लागून असलेल्या गाव खेड्यातून बाजाराकरिता येणारे लोक यांची प्रचंड गर्दी आठवडी बाजारात पाहावयास मिळते. तुमसर, गोंदिया या मुख्य मार्गाला लागूनच दुतर्फा भाजीपाल्याची अस्थायी दुकाने मांडली जातात. मुख्य रस्ता असल्यामुळे गोंदिया मार्गाने होणारी वाहतुक नेमकी आठवडी बाजाराच्या दिवशी ठप्प पडत असते हे विशेष.लोक प्रतिनिधी तसेच नगर परिषद प्रशासन पंचवार्षिक योजनेप्रमाणे बदलत जाते मात्र सत्तेत येताच आठवडी बाजाराच्या पर्यायी सुविधेच्या प्रश्नावर मौन धारण करत असतात. तुमसर शहराच्या वाढत्या लोकसंख्येभिमुख वाढत्या वाहतुकीचा प्रश्न नित्य भेडसावत असतो. नगर परिषद प्रशासनाने येथे दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. श्हराच्या विकास कामांच्या आराखड्यात तुमसर येथे भरणारा आठवडी बाजार हा महत्वाचा मुद्दा असतो. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना प्रत्येक मंगळवारच्या बाजाराच्या दिवशी त्रास सहन करावा लागतो.तुमसर शहरात आठवडी बाजार भरण्याकरिता पर्यायी जागेची स्थायी सोय नाही. मात्र नगर परिषद प्रशासनाने शहराला लागून असलेल्या रेल्वे टाऊनच्या मोकळ्या जागी तसेच नेहरू शाळेचे भव्य प्रांगण राष्ट्रीय शाळेचे प्रांगण याचा आठवडी बाजार भरण्याकरिता पर्याय म्हणून विचार करणे आवश्यक झाल्याची चर्चा सध्या शहरात केली जात आहे. रेल्वे प्रशासनाला तसे पत्रव्यवहार करून आठवडी बाजार रेल्वे टाऊन तुमसरला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर करण्याची आवश्यकता येथे दिसून येत आहे.आठवडी बाजाराच्या दिवशी दुकानांमुळे बोसनगर ते टेलिफोन एक्सचेंज पर्यंतचा मार्ग हा पुर्णपणे बंदच होतो तर काही देव्हाडी मार्गावरील रेल्वे फाटकच्या पलिकडे नाग मंदिरापर्यंत सुद्धा भाजीपाल्याची दुकाने थाटली जात आहेत. यावर नगर परिषदेला विचारणा केली असता तुमसर शहराच्या आठवडी बाजाराकरिता पर्यायी सुविधेकरिता रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केले असल्याचे सांगण्यात आले आहे. बाजाराच्या दिवशी नागरिकांना न.प. तुमसर मार्फत पुरविण्यात आलेल्या ठिकाणी गाडी पार्किंग करण्याकरिता वारंवार सांगण्यात आले असून मात्र नागरिकांकडून यावर प्रतिसाद मिळण्याची गरज नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी व्यक्त केली आहे.आठवडी बाजाराच्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरांकडून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिणे तर कुणाचे मोबाईल तर कुणाचे पॉकीट लंपास करण्याच्या प्रकार घडतच असतात. बाजाराची पर्यायी जागा नसल्यामुळे महिलांना याचा एकच त्रास सहन करावा लागतो. तुमसर शहराला कुबेर नगरीची ख्याती आहे. मात्र आठवडी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्यामुळे ही ओळख नामशेष ठरत आहे. नगर प्रशासनाने यावर विचार करून आठवडी बाजाराची पर्यायी सुविधा करणे गरजेचे ठरले आहे.रेल्वे प्रशासनाला तुमसर टाऊनमधील जवळपास चार एकर जागेपैकी आठवडी बाजारा करिता एक एकर जागेच्या मागणीचा प्रस्ताव पाठविलेला आहे. मात्र नागरिकांनी बाजाराच्या दिवशी आपली वाहने न.प. द्वारे नमुद केलेल्या ठिकाणी पार्क करूनच जर बाजार केला तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो.-प्रदीप पडोळे, नगराध्यक्ष, नगर परिषद तुमसर.