भंडारा : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात आज, ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भंडारा, पवनी, साकोली, लाखनी, तुमसर,मोहाडी, लाखांदूर तालुक्यात मराठमोळी वेशभूषा परीधान करुन गुढीपाडवा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा येथील श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने महात्मा गांधी चौकासह शहरातील विविध ११ ठिकाणी ५१ फूट उंचीची गुढी उभारण्यात आली. सकाळी, गांधी चौकात नगराध्यक्ष बाबूराव बागडे व शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. त्यानंतर श्रीगणेश हायस्कूलमध्ये कॅनव्हास पेंटिंग व प्रदर्शनी घेण्यात आली. सायंकाळी तुळजाभवानी मंदिरातून दुचाकी रॅली काढण्यात आली. दिवसभर मराठी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षांव सुरु होता. गुढीपाडवा उत्सव साजरा होत असताना प्रत्येकांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले होते. शहरात आयोजित रॅलीमध्ये महिलांसह पुरुष, बालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पक्ष भेदाभेद विसरून अनेकांनी उत्सवात सहभाग दर्शवून राष्ट्रीय एकात्मता जोपासली.