भंडारा : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळावर महिला, पुरुष, तरुणाईची गर्दी होती. भंडारा शहराजवळील कोरंभी (देवी) मंदिर, चांदपूर जलाशय, गोसेखुर्द धरण याठिकाणी पर्यटकांनी नववर्षाचा आनंदोत्सव साजरा केला. नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंद, उत्साहात जावा यासाठी अनेकांनी नियोजन केले होते. ३१ डिसेंबरला शनिवार असल्यामुळे अनेकांनी नववर्षाचा पहिला दिवस मांसाहारावर ताव मारत साजरा केला.
रविवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच पर्यटकांची पावले पर्यटनस्थळांकडे वळली होती. दुपारनंतर या पर्यटनस्थळावर गर्दी झाली होती. गोसेखुर्द धरणासह कोरंभी, रावणवाडी, चांदपूर, आंभोरा आदी धार्मिकस्थळी भाविकांचे जत्थेच्या जत्थे दिसून आले. देवदर्शन आणि त्यानंतर ‘फुल्ल टू एन्जॉय’च्या मूडमध्ये भाविक होते. दुपारच्यावेळी अनेकांनी कुटुंबासह सहभोजनाचा आस्वाद घेतला. सायंकाळनंतर त्यांनी हे ठिकाण सोडले. पर्यटनस्थळी ‘एन्जॉय’ करण्यासाठी पर्यटक दाखल झाले होते. काहींनी सोबत डबे आणले होते. बहुतांश पर्यटकांनी पर्यटनस्थळीच स्वयंपाक करण्यावर भर दिला होता. महिला मंडळी स्वयंपाकात व्यस्त दिसत होत्या. काही ठिकाणी पुरुष स्वयंपाकात मदत करीत होते. बहुतांश ठिकाणी पुरुष नववर्षाचा पहिला दिवस एन्जॉय करताना दिसून आले होते. तरुणाई ज्या वाहनांनी आलेली होती, त्या वाहनातील ‘डीजे’वर बेधुंद होऊन नाचत होती.
स्थानिकांना रोजगार, ग्रामपंचायतीला महसूल
कोरंभी देवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या वैनगंगा नदीकाठावर नववर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक हजेरी लावत असतात. त्यानिमित्त त्यातून रोजगार मिळावा यासाठी कोरंभी येथील स्थानिक लोक दुकाने लावतात. या दुकानाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. दुसरीकडे नदीकाठावर जाण्याच्या मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहनांकडून शुल्क आकारले जाते.
पर्यटनस्थळ पण सुविधांचा अभाव
गोसेखुर्द धरण परिसरात पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु याठिकाणी पुरेशा सुविधा नाहीत. पर्यटनाची अनेक स्थळे आहेत; परंतु एकाही ठिकाणी सुविधा नाहीत. गोसेखुर्द धरणात जलस्तर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर विहंगम दिसतो. या धरणाच्या खालील भागात सायबेरीयन पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. हे पक्षी पाहण्यासाठी या परिसरात वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पक्षीप्रेमी मोठ्या प्रमाणावर येतात. धरणाकडे जाणारा मार्ग अरुंद असून या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी आहे.