लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसात आधारभूत केंद्रावरील धानासह कडपा ओला झाला आहे. थंडीचा जोर वाढला असून ढगाळी वातावरणाने शेतकरी धास्तावला आहे. पावसाने मळणीचे काम ठप्प झाले असून काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. गुरूवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून दुपारी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रात्री भंडारा शहरासह अनेक भागात पाऊस कोसळला. शुक्रवारीसुद्धा संपूर्ण दिवसभर ढगाळी वातावरण दिसून आले. वातावरणात प्रचंड गारवा वाढला आहे. सध्या शेतशिवारात धान मळणीचे काम वेगात सुरू आहे. परंतु या अवकाळी पावसाने संपूर्ण काम ठप्प झाले आहे. काढलेला धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अनेकांकडे ताडपत्री व इतर साधने नसल्याने धान ओला होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी आपला धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रावर नेला आहे. तो धानही ओला होण्याची भीती आहे. पावसाळी वातावरणाने शेतकरी धान झाकण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. गत खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटाचा सामना करावा लागत आहे. आता धान घरी येत असतानाही या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा संकटात टाकले आहे. गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने फुलोऱ्यावर आलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी फवारणी सुरू केली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणाने अळींचा प्रादूर्भाव वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात तूर पीक सलग पद्धतीने न घेता बांधावर घेतली जाते. घरी खाण्यापुरती तूर शेतात लावली जाते. परंतु आता या ढगाळ वातावरणाने तूर नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकरी नैसर्गिक आपत्तीचा सामना करत हतबल झाल्याचे चित्र आहे.
आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांची धावपळअवकाळी पावसाची टांगती तलवार असून हवामान खात्याने आणखी दोन दिवस पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी धान घेवून गेलेल्या शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. पावसाने धान ओला झाल्यास त्याचा दर्जा खालावतो. प्रसंगी ओले झालेले धान पाखर होताच आणि या धानाला कोणतीही किंमत राहत नाही. त्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोजणीचा वेग वाढवावा, अशी मागणी आहे.