भंडारा : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी दहावीच्या परीक्षांप्रमाणेच बारावीच्या परीक्षाही रद्द कराव्यात की नाही, याबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर परीक्षा घेतल्या नाहीत तर पर्याय काय, यावर शासन विचार करीत आहे; परंतु या दुहेरी भूमिकेच्या कचाट्यात विद्यार्थी व पालक सापडले आहेत. येत्या दोन-चार दिवसांत यावर निर्णय घेण्यात येणार असला तरी अनेक पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
उल्लेखनीय म्हणजे बहुतांश राज्ये परीक्षा घ्याव्यात याच भूमिकेत आहेत. मात्र, परीक्षा मंडळ, तज्ज्ञ मंडळी व विद्यार्थी-पालकांच्या सूचनेवरूनच शासन निर्णय घेणार असल्याचे समजते.
भंडारा जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेला १५ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी मुलांची संख्या ७,७३० एवढी असून, मुलींची संख्या ७,७८० इतकी आहे. विज्ञान, कला वाणिज्य, टेक्निकल सायन्स व व्होकेशनल या शाखांतून विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. एक वेळा परीक्षा रद्द झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून इयत्ता बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र, संकट काळामुळे त्यावरही संभ्रम निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे तज्ज्ञांमधून विद्यार्थ्यांना स्वाध्याय, ऑनलाइन परीक्षा किंवा दहावीच्या पार्श्वभूमीवर गुणांकन पद्धतीने किंवा इयत्ता बारावी इंटरनल गुणांच्या आधारे मार्कलिस्ट द्यावी, असा सूर व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयाच्या शैक्षणिक प्रगतीविषयी विषय शिक्षकांना माहिती असते. विशेष शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून प्राचार्यांच्या
स्वाक्षरीनिशी गुणपत्रिका बोर्डाकडे पाठवावी. गुणांकनासाठी दहावीचा आधार घेता येईल. प्रत्येकाला ग्रेड दिल्यास पुढील प्रवेशासाठी गुणांची अडचण नाही.
-संजय आयलवार,
सेवानिवृत्त, विभागीय सहायक सचिव.
इयत्ता बारावीची परीक्षा होणे महत्त्वाची बाब आहे; परंतु परीक्षा होत नसतील तर शालेय इंटरनल गुणांच्या पद्धतीने गुणपत्रिका देता येईल. स्वाध्याय किंवा ऑब्जेक्टिव्हरहित प्रश्नांच्या आधारे ऑनलाइन परीक्षा घेता येऊ शकते. परीक्षा होत नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांचा हिरमोड होऊ शकतो.
- केशर बोकडे, प्राचार्य
लाल बहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा
परीक्षेला पर्याय नाही. परीक्षा व्हायलाच पाहिजेत. मात्र, पर्यायांचा विचार केल्यास ऑनलाइन किंवा स्वाध्याय अध्ययनाचा विचार करावा. हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थी मागे पडू नयेत, याचाही विचार करावा.
- अशोक पारधी,
कार्याध्यक्ष, विदर्भ मुख्याध्यापक संघटना.
गुणांकन पद्धतीचा विचार केला जात असेल तर हुशार विद्यार्थ्यांची गुणवत्ता अन्य विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतच मोजली जाणार काय, असा सवाल उपस्थित होऊ शकतो. वर्षभर अभ्यास, मेहनत केल्यावर परीक्षा होत नसतील तर आमच्या अभ्यासाचे फलित काय होणार, असा प्रश्न पडतो. यावर विचार व्हायला हवा.
- प्राजक्ता शेंडे, विद्यार्थिनी.
वर्षभर स्वाध्याय, काही काळ खाजगी ट्यूशन व शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. अशा स्थितीत ऐनवेळी तेही दुसरी वेळ परीक्षा रद्द होत असेल, तर ही आमच्यासाठी निराशाजनक बाब आहे. आम्ही कोणत्या विषयात पक्के आहोत, हे आम्हाला परीक्षेतूनच कळू शकते. त्यावरून पुढच्या क्षेत्रात पाऊल ठेवता येईल.
- सुहास खोब्रागडे, विद्यार्थी.
महिनाभरापूर्वी परीक्षा होणार होत्या. कोरोना महामारीमुळे आता परीक्षेऐवजी पर्यायांचा विचार सुरू आहे. नेमके काय होणार आहे, याबाबत आम्ही संभ्रमात आहोत. परीक्षा मंडळ वेळेवर निर्णय घेत असेल तर आमच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्हच आहे. समोर काय होणार, याची कल्पना काय करावी, हेच सुचेनासे झाले आहे.
- रिद्धी बारसागडे, विद्यार्थिनी.