लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : ‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला. अवैध प्रवासी वाहतुकीने सहा जणांचे बळी घेतल्यानंतर बुधवारी चौकात एकही वाहन दिसत नव्हते.साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीत काळीपिवळी जीप पडून सहा जणांचा बळी गेला. अवैध प्रवासी वाहतुकीचे हे बळी ठरले. गत काही वर्षांपासून साकोलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. शहराच्या मध्य वस्तीत आणि बसस्थानकालगत या वाहनधारकांचा डेरा असतो. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सकाळपासूनच जोरजोराने आवाज दिला जातो. प्रवाशांना खचाखच भरून प्रवास केला जातो. वाहतुकीच्या नियमांचा फज्जा उडवत अपघाताला आमंत्रण दिले जाते. साकोली हे तर अवैध वाहतुकीचे मुख्य केंद्र झाले आहे. येथे विविध कामानिमित्त शेकडो नागरिक दररोज येतात. पुरेशा एसटी बस अभावी नागरिक या अवैध प्रवासी वाहनांना पसंती देतात. आॅटो रिक्षा, काळीपिवळी यासह इतर वाहनातून प्रवास केला जातो. पोलिसांच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार सुरु असतो. परंतु कुणीही त्याला अटकाव करीत नाही.साकोली बसस्थानक परिसर, एकोडी रोड, लाखांदूर रोड, जुने बसस्थानक या ठिकाणी काळीपिवळी वाहने दिवसभर उभी असतात. प्रवाशांना कोंबून बसविली जाते. अपघातानंतर बुधवारी साकोलीत एकही अवैध प्रवासी वाहन दिसले नाही. ज्या ठिकाणी दिवसभर गोंगाट असतो त्या परिसरात बुधवारी शुकशुकाट दिसत होता. ना कोणता गोंधळना, ना कुणाचा आवाज.पोलिसांची मेहरनजरसाकोलीसह जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक बिनबोभाट सुरु आहे. ही वाहतूक केवळ हप्तेखोरीच्या बळावर सुरु आहे. वाहनचालक खुलेआम कुणाला किती हप्ता द्यावा लागतो हे प्रवासादरम्यान सांगतात. सामान्य माणसाला त्याचे काही देणेघेणेही नसते. परंतु कुंभलीसारखी घटना घडते तेव्हा प्रश्न ऐरणीवर येतो. पोलिसांचे असलेले साटेलोटे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी घेणार हा प्रश्न आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच या वाहतुकीला हद्दपार करण्याची गरज आहे.
‘है क्या.. भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ आवाज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 1:04 AM
‘है क्या... भंडारा, तुमसर, लाखनी, गोंदिया’ असा आवाज सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु असायचा. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वाहतूकदार जोरजोराने ओरडायचे. मात्र मंगळवारी भीषण अपघात झाला, आणि साकोलीच्या चौकात येणारा हा आवाज बंद झाला.
ठळक मुद्देअपघाताचा परिणाम : अवैध प्रवासी वाहने क्षणार्धात बेपत्ता, पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई नाही