भंडारा : नाकाडोंगरी जंगलात बिबट्याच्या जोडीवर इसमांकरवी दगडफेक करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे या घटनेचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. याबाबत वाईल्ड वॉच फाऊंडेशनने टायगर सेलकडे तक्रार केली असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यासंदर्भात सखोल तपासाचे आदेश दिले आहेत.
माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी जंगल शिवारात अनेक हिंस्र प्राणी आहेत. यात वाघ, बिबट, अस्वल, रानगवा यासह अन्य प्राण्यांचाही समावेश आहे. सोमवारच्या सुमारास काही इसम फिरण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनाने नाकाडोंगरी जंगल शिवारात गेले होते. या वाहनात एकूण पाच इसम होते. जंगल शिवारात गाडी थांबवून रस्त्याच्या कडेला उंच झाडावर बसलेल्या बिबट्याच्या जोडीवर त्यांची नजर गेली. वाहन थांबवून इसम खाली उतरले. याचवेळी व्हिडिओ शूटही करण्यात आले. याचेवेळी काहींनी बिबट्याच्या जोडीवर दगडफेक केली. या संपूर्ण घटनेची व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाली. उल्लेखनीय म्हणजे पाचपैकी तीन जण पोलिस विभागात कर्मचारी असल्याचे समजते.
पाचपैकी दोन जणांनी दगडफेक केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यासंदर्भात वाईल्ड वॉच फाउंडेशनने टायगर सेलकडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करीत वन्यजीवांच्या अधिवासात हस्तक्षेप करून व दगडफेक करणाऱ्या इसमांवर कारवाईची मागणी केली आहे.
आधीच बिबट्यांची संख्या कमी आहे. त्यातही त्यांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप होत असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दरम्यान, घडलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय असून बिबट्यांच्या जोडीवर दगडफेक करणाऱ्या इसमांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाईची आमची मागणी आहे.
- नदीम खान, मानद वन्यजीव संरक्षक, भंडारा.
व्हिडिओमध्ये पाचपैकी तीन जण पोलिस कर्मचारी आहेत. मात्र त्यापैकी कुणीही दगडफेक केली नाही. यासंदर्भात तुमसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रकरण तपासासाठी सोपविले आहे. तपासानंतर कारवाईचे निर्देश देण्यात येतील.
-वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.