लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात लहान मुलांमध्ये 'हात, पाय, तोंड रोग' अर्थात 'हँड फूट माउथ डिसिज' होण्याचा प्रकार आढळून आला आहे.
हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. या काळात रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. मुलाला ताप, अंगावर पुरळ आणि तोंडात फोड आल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय उपचाराने हा आजार पाच दिवसांत बरा होतो. त्यामुळे कुणीही घाबरण्याची गरज नाही, असेही बालरोगतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ताप येणे. घसा खवखवणे. जीभ, हिरड्या, गालाच्या आतील भागात वेदनादायक फोडासारख्या जखमा होतात. तळवे आणि कधी कधी नितंबावर पुरळ येते, पुरळ खाजत नाही.
'हँड फूट माउथ डिसिज' हा आजार कांजण्यासारखाचा दिसतो. मात्र, त्या कांजण्या नाहीत. तसेच सध्याची जी मंकीपॉक्सची भीती वाटते, तोसुद्धा हा आजार नाही. या आजारात बाळांच्या त्वचेवर फोड येतात. हा आजार योग्यवेळी उपचार मिळाल्यानंतर बरा होतो. त्यामुळे, पालकांनी घाबरून जाऊ नये, तसेच हा आजार झालेल्या बाळाला इतर बाळापासून दूर ठेवावे. लहान मुलांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत असतो. - डॉ. अमित कावळे, बालरोगतज्ज्ञ, भंडारा