सरल या ऑनलाइन प्रणालीअंतर्गत विद्यार्थी, शिक्षक व शाळेसंबंधी २५०हून अधिक प्रकारची माहिती संगणकावर भरावी लागते. शालेय पोषण आहार, माध्यान्ह भोजनाकरिता सामान जमा करण्यापासून त्याचा हिशेब देण्यापर्यंतची कामे, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर (डीबीटी) योजनेंतर्गत गणवेश, पाठ्यपुस्तके, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांकरिता असलेल्या विविध योजना, सवलतींचे पैसे सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या खात्यावर जमा होतात. राष्ट्रीयीकृत बँकेत खाती उघडणे, आधारशी जोडणे, आदिवासी, स्थलांतरित कामगार असलेल्या पालकांना गाठणे, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढून देणे, गेल्या काही वर्षांत तब्बल ५००हून अधिक शिक्षकांची विविध प्राधिकरणांवर नियुक्ती करण्यात आली आहे. हे शिक्षक अधिकाऱ्यांच्या हाताखाली अक्षरश: अनेक कामे करतात. या शिक्षकांच्या जागी दुसरे शिक्षक दिले न गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. विविध शिष्यवृत्त्या, परीक्षांचे अर्ज भरणे, राज्य व केंद्रीय स्तरावरील विविध शिष्यवृत्त्या, दहावीचे परीक्षा अर्ज ऑनलाइन भरून घेणे, याव्यतिरिक्त शाळेच्या विविध उपक्रमांकरिता खासगी संस्था वा व्यक्तींकडून आर्थिक निधी जमा करणे, विविध जयंती, मोहीम, उपक्रम साजरे करून त्यांची माहिती देणे व कोविड काळात लसीकरण केंद्रावरही शिक्षक काम करीत आहेत. विद्यादानापेक्षा बाबूगिरीची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत.
बॉक्स
इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत एक शिक्षक
अशैक्षणिक कामांचा बोजा प्रत्येक शाळेवर असल्याने त्या-त्या शाळेतील शिक्षक अशैक्षणिक कामे एका शिक्षकाकडे सोपवून त्या शिक्षकाचे वर्ग घेण्यासाठी तयारी दर्शवितात.
एक शिक्षक नुसत्या अशैक्षणिक कामांसाठी लागत असल्याने त्या कामासाठी शाळेतील सातपैकी एक शिक्षक अशैक्षणिक कामेच करीत असतो. त्या शिक्षकाला अशैक्षणिक कामाशिवाय दुसरे कामच करता येत नाही.
मुख्याध्यापकांना सतत खिचडी, गणवेश, बैठका व मागितलेली माहिती पुरवावी लागते. त्यातच त्यांचा वेळ जातो. मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या वर्गावर जाताच येत नाही. एवढी अशैक्षणिक कामे मुख्याध्यापकांनाही असतात.