भंडारा : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. परंतु या दहावीच्या गुणपत्रिकेवर काय शेरा असणार? दाखल्यावर तारीख आणि महिना कोणता राहील? या संभ्रमात स्वत: मुख्याध्यापकही आहेत. हीच चिंता विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सतावत आहे.
शिक्षण मंडळाने आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका काढली, त्यात एप्रिल २०२१ असे नमूद आहे. परंतु दाखल्यावर तो महिना लिहायचा किंवा नाही अशा संभ्रमात मुख्याध्यापक आहेत. यामध्ये ‘शेरा’चा कॉलम सुटलेला आहे. त्यामुळे काय शेरा असणार हे सांगता येत नाही. आता बोर्डाच्या सूचना आल्यावरच संभ्रम दूर होणार आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या टीसी तयार केल्या आहेत. जगभरात कोरोनाचे संकट कायम असल्याने यातून महाराष्ट्र कसा सुटणार? तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. शिक्षण मंडळाने नववीच्या आधारावर दहावीचा निकाल दिला; परंतु या निकालात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. नवव्या वर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे या निकालाने नुकसान झाले. आता निकाल लागल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. शाळा सोडण्याच्या दाखल्यावर तारीख, महिना तसेच शेरा काय लिहायचा, हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
पालक म्हणतात-
दहावीचा निकाल लागला; परंतु शाळेकडून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेश कसा घ्यायचा, हा प्रश्न आहे. आता सर्व विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतील तेव्हाच आपल्या मुलीलाही शाळेत प्रवेश घेऊ.
- रोशन लांजेवार, पालक
नववीच्या आधारावर दहावीचे गुण देण्यात आले. परंतु नववीला कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. दहावीचा निकाल लागूनही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. कोरोनाच्या संकटाने आमच्या मुलांचे शिक्षण बुडाले. आता अकरावीच्या प्रवेशासाठी कामाला लागणार.
- ललीता रामटेके, पालक
मुख्याध्यापक काय म्हणतात...
विद्यार्थ्यांची टीसी तयार करताना त्या टीसीवर शेरा काय लिहायचा यासाठी आता शासनाच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. आमच्या शाळेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही त्यांच्या व्यवहार व वागणे यावरून शेरा लिहीत होतो. आता मात्र विद्यार्थ्यांचा शेरा शासनाच्या सूचनेवरून लिहिणार आहोत. अद्यापपर्यंत शासनाच्या आदेशाची वाट पाहत आहोत.
- एक मुख्याध्यापक
दहावीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. नववीच्या आधारावर दहावीचे गुणदान करण्यात आले. परंतु टीसीवर काय शेरा लिहायचा यासंदर्भात सूचना देण्यात आल्या नाहीत. तसेच टीसीवर तारीख आणि महिना काय नमूद करावा याच्याही सूचना मिळाल्या नाहीत. शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचना मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या टीसीवर शेरा लिहिण्याचा निर्णय होईल.
- एक मुख्याध्यापक
बोर्डाने या शेरासंदर्भात आतापर्यंत मार्गदर्शक सूचना पाठविलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना येताच तशा सूचना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येईल. शासन सर्व गोष्टीवर माहिती देत आहे. यावरही माहिती लवकरच देईल अशी आशा आहे.
- संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प. भंडारा