किटाडी येथील नरेश निपाने यांच्या साडेतीन एकर शेतात गव्हाचे पीक जोमात आहे. गहू कमी पाण्यात व्यवस्थित व्यवस्थापनात अधिक उत्पन्न देणारे रब्बी पीक आहे. दैनंदिन आहारात गव्हाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याच भागातील गहू चवदार असल्याने अनेक शेतकरी घरी खाण्यापुरता तरी गहू पेरणी करतात. व्यापारी दृष्टिकोनातून गव्हाची शेती बरेच शेतकरी करतात. गतवर्षीचा अनुभव घेता गव्हाला बावीस ते पंचवीस रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता. यावर्षी धानाचे उत्पन्न कमी झाल्याने गव्हाला अधिक मागणी राहील, असा अंदाज शेतकरी वर्गातून उमटला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गव्हाचे पीक अनेक शिवारात दिसत आहे.
उत्तरेकडील थंड वारे विदर्भाच्या दिशेने घोंगावत असल्याने गत हप्ताभरापासून थंडीने हजेरी लावलेली आहे. ही थंडी गहू पिकाला पोषक समजली जाते. थंडी आणखी निदान आठवडाभर तरी जोमाची राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.