भंडारा: जिल्ह्यातील एका तालुक्यातील कृषी विभागात कार्यरत असलेले अधिकारी मागील वर्षीपासून शासकीय चारचाकी वाहनाचे टायर खराब झाले असल्याचे बतावणी करून अनेक कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून २ ते ५ हजार रुपये मागत असल्याने सदर अधिकाऱ्याविरोधात कृषी विक्रेत्यांमध्ये रोष दिसून येत आहे.
कृषी निविष्ठा विक्रेत्याच्या दुकानात जाऊन सदर अधिकारी हा विनाकारण त्रुटी दाखवून कारवाई करण्याची धमकी देत असतो. कारवाईपासून वाचायचे असल्यास कार्यालयात असलेल्या चारचाकी वाहनांसाठी टायर घेऊन देण्याची मागणी करीत असतो. अनेक कृषी निविष्ठा विक्रेते कारवाईच्या धाकापाई टायर खरेदीसाठी रुपये देऊन मोकळे होत असल्याचे दिसून येत आहे.
काही कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा कारभार अत्यंत पारदर्शक असूनसुद्धा त्यांच्याकडून ही कारवाईच्या नावाखाली जबरीने पैसे उकळल्याचा प्रकार एका तालुक्यात सर्रास सुरू आहे. जिल्ह्यातील एका तालुक्यातील हा अधिकारी कोण आहे, हे सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना माहिती असूनही कुणीही याला विरोध करीत नाहीत; मात्र दबक्या आवाजात सदर अधिकऱ्याविरोधात प्रचंड रोष दिसून येत आहे. सदर अधिकाऱ्याच्या टायर खरेदीसाठी वसुलीची चर्चा संपूर्ण जिल्हाभर असून इतर तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेते सदर अधिकारी कोण असावा, याबाबत तर्कवितर्क बांधत आहेत.