भंडारा शहरातून थेट रायपूर, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, पुणे आदी शहरासाठी आजही बुकिंग होत आहे. मात्र पूर्वीप्रमाणे प्रवाशांची गर्दी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. यापूर्वी लग्नसोहळा, धार्मिक विधी कार्यक्रमासाठी या दिवसात बुकिंग होत असत. मात्र सध्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने अनेक बुकिंग रद्द होत आहेत. १८ गाड्या कोरोनापूर्वी धावत होत्या. मात्र आता पुन्हा एकदा वाढत्या कोरोना संसर्गामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे ट्रॅव्हलच्या फेरीतही घट झाली आहे. आता पुन्हा एकदा सरकारने मोठ्या महानगरामध्ये वेळेचे बंधन घातले असल्याने, दररोज धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसेसही भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात कमी संख्येने धावत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायावर अवलंबून असणारे ड्रायव्हर, सफाई कामगार, बुकिंग एजंट, प्रवाशांना, खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने बँकांच्या पैशाची परतफेड कशी करावी, अशा विवंचनेत अनेक जण आहेत. या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनाही शासनाने दिलासा देण्याची गरज आहे.
बॉक्स
आताच कुठे गाडी रुळावर आली होती...
राज्यात कोरोना संसर्ग येण्यापूर्वी ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चांगल्या स्थितीत चालत होता. राज्यातील मोठ्या महानगरामध्ये तर दररोज ३०० ते ५०० हून अधिक ट्रॅव्हल्स धावत होत्या. भंडारा जिल्ह्यात दररोज १५ ते २० ट्रॅव्हल्स धावतात. मात्र आता कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या शहरामध्ये, विविध जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्याने ट्रॅव्हल्स व्यावसायिक, तिकीट बुकिंग करणारे चालक व वाहक यांच्या रोजगाराचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट
कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पूर्वीसारखा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिकांचा दररोजचा खर्च निघणेही अवघड झाले आहे. या व्यवसायात आर्थिक भांडवल मोठे लागत असल्याने बँकांचे हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न आहे. ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे उत्पन्नही घटले आहे. आमच्या कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गुणवंत तिडके, भूषण ट्रॅव्हल्स भंडारा.
कोट
कोरोनापूर्वी जसे रायपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरासाठी भंडारा येथून बुकिंग व्हायची, तशीच बुकिंग व्हायची तसेच आजही होत आहे. मात्र अलीकडे १५ दिवसात प्रवाशांची संख्या घटली आहे. ट्रॅव्हल्सचा प्रवास आजही संपूर्ण सुरक्षितच आहे.
सुमेश नागदिवे, सुमेश ट्रॅव्हल्स,भंडारा.
कोट
कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. आताच कुठे चार महिने चांगली सुरुवात झाली होती. तोपर्यंत पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्याने ट्रॅव्हल्स व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. प्रवासी प्रवास करताना जशी काळजी घेतात तसेच आम्हीदेखील सर्व उपाययोजना करतो. मात्र तरी शासनाने आम्हाला मदत करण्याची गरज आहे.
हेमकृष्ण वाडीभस्मे, हरेश ट्रॅव्हल्स, भंडारा.