नालीचे बांधकाम अपूर्ण : अपघाताची शक्यता, सोमवारी नागरिक पालकमंत्र्यांना निवेदन देणारतुमसर : तुमसर - भंडारा राज्य महामार्गावरील रस्ता बांधकामावर ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. रस्त्याला लागून असलेली नाली बांधकाम अद्याप अपूर्ण असून त्यावरील पूल आजपर्यंत बांधला नाही. अपघातप्रवण स्थळ म्हणून त्याची ओळख झाली आहे. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या संदर्भात सोमवारी पालकमंत्र्यांना येथील नागरिक निवेदन देणार आहेत.पंचायत समिती खापा ते जुने बसस्थानक तुमसरपर्यंत पाच कोटीच्या रस्ता बांधकाम सुमारे पाच वर्षापूर्वी करण्यात आले होते. या रस्त्यावर दूभाजक तयार केले आहे. रस्त्याच्या बाजूला नाली बांधकाम करण्यात आले. शहरातील भंडारा रोड मार्गावर विनोबा नगरात नाली बांधकाम अपूर्ण आहे. नालीपलिकडे कॉलनी आहे. पुल तयार न केल्याने नाली येथे खचत आहे. रस्त्यावरील कच्चा पुल अपघात प्रवण स्थळ बनले आहे. नालीच्या पुलाचे बांधकाम का थांबविण्यात आले हा मुख्य प्रश्न आहे. या रस्त्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग मोहाडीने केले होते. पंचशिल गृहनिर्माण सहकारी संस्थेचे पदाधिकारी योगीराज शेंडे, अशोक तलमले, एम.टी. बोळणे, मिलिंद डोंगरे, सुरेश कोटांगले, सुरेश भाजीपाले यांनी आतापर्यंत संबंधित विभागाला तक्रार केली होती. परंतु कोणतीच कारवाई झाली नाही. पालकमंत्री डॉ.दिपक सावंत, आ.चरण वाघमारे या मार्गावर एका कार्यक्रमानिमित्त येत असून तेव्हा त्यांना निवेदन सादर करण्यात येईल. लोकप्रतिनिधी यावर कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाच कोटीच्या रस्त्यावर पूल केव्हा?
By admin | Published: February 02, 2016 1:01 AM