भंडारा : कोणताही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये म्हणून दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मोहीम राबविली जाते. मात्र, अद्यापही हाती पाटी-पेन्सिल धरणारे हात शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहून रस्त्यावर भीक मागताना दिसून येत आहेत. भंडारा शहरातील बसस्थानक व बाजारपेठेत फिरणाऱ्या चिमुकल्यांना विचारणा केली असता घरच्यांच्याच आग्रहास्तर भीक मागत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या चिमुकल्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. औरंगाबादमध्ये अलीकडेच भीक मागण्यासाठी मुलाची खरेदी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यामुळे ‘लोकमत’ने शहरातील बसस्थानक, बाजारपेठेत जाऊन भीक मागणाऱ्या चिमुकल्यांकडून माहिती जाणून घेतली. या दरम्यान काही पालकही या चिमुकल्यांसोबत भीक मागताना दिसून आले, तर काहींनी आमच्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून आम्ही भीक मागण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. यातील एका मुलाने तर निराधार असल्याचे सांगितले, तर एका मुलाने आई-वडिलांच्या सांगण्यावरून आम्ही हे काम करीत असल्याचे सांगितले. शिक्षण व शाळेबद्दल विचारले असता, त्यांनी याकडे दुर्लक्ष करुन काढता पाय घेतला. त्यामुळे शिक्षणाचा गंध त्यांना कधी शिवलाच नसल्याचे दिसून आले. या चिमुकल्यांचा पालकच आपल्या गरजा भागविण्यासाठी वापर करीत असल्याचे लक्षात आले. भीक मागणाऱ्या मुलांसाठी शासन विशेष मोहीम राबवित असली तरी अद्यापही यावर आळा बसलेला नाही.
शासनातर्फे शाळाबाह्य मोहीम दरवर्षी राबविली जाते. मात्र, भीक मागणारे मुले यातून सुटत असतात. हे या मोहिमेतून दिसत नाही काय? भीक मागणाऱ्या मुलांसाठी शासनाने मदत करून त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्याची मागणी आहे.
-राकेश साखरे, सामाजिक कार्यकर्ते
उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असल्याने पालकांच्या अट्टाहासापुढे मुलांना भीक मागावी लागत आहे. ही परिस्थिती आणखीच बिकट होत चालली आहे. अशा पालकांवरच फौजदारी कारवाई करावी. प्रशासनाने सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्यांना लगेच बालगृहात ठेवावे.
-संजय मते, सामाजिक कार्यकर्ते
जिल्हा परिषद चौक
भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात व्यापारी प्रतिष्ठान व शासकीय कार्यालयात जाऊन मुले व त्यांचे पालक भीक मागताना दिसतात. काही नागरिक त्यांच्या हातावर पैेसे ठेवत होते, तर काही त्यांना हाकलून लावत होते. त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि शाळेबद्दल विचारले तर परिस्थिती बेताची असल्याचे सांगितले.
बसस्थानक परिसर
शहरात मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानकावर भीक मागणारे मुले प्रवाशांच्या जवळ येऊन पैसे मागतात. भीक का मागता? शाळा का शिकत नाही? असा प्रश्न केल्यास घरची स्थिती बेताची असल्याचे कारण सांगून शिक्षण कसे घेणार अशी खंत त्या मुलाने व्यक्त केली. बसस्थानक परिसरात चार-पाच मुले भीक मागताना दिसून येतात.