लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर :तुमसर शहर, तालुका व मध्य प्रदेशातील रुग्ण मिळून सुमारे २ लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय घेते असते. परंतु या रुग्णालयात शासनाने इव्हेंट (उपक्रम) अंतर्गत तीन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. येथे नियमित तीन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची गरज आहे. कमतरतेमुळे गरोदर महिला व नवजात शिशूचे आरोग्य धोक्यात आले आहे. रेफर टू भंडाराचे प्रमाण वाढले आहे.
तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांचे असून, राज्य शासनाने या रुग्णालयाचा दर्जा वाढविल्याने आता २०० खाटांचे रुग्णालय होणार आहे. राज्यात या रुग्णालयाला आरोग्य सेवेकरिता राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळविला होता.
साकोली येथील स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्त्ती ही इव्हेंट उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे. त्यात एक स्त्रीरोग तज्ज्ञ साकोली येथील असल्याची माहिती आहे. गरोदर महिला, प्रसूती तसेच नवजात शिशूना तत्काळ स्त्रीरोग तज्ज्ञांची गरज पडते. त्यामुळे येथे स्थानिक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांकडून ही सेवा आरोग्य विभागाने घेण्याची गरज आहे.
खासगी डॉक्टरांची घ्यावी लागते सेवा प्रसूती महिला, गरोदर महिला तसेच नवजात शिशूना स्त्रीरोग तज्ज्ञांची नितांत गरज पडते. अनेकवेळा भंडारा येथे रेफर करण्याची वेळ येते. अशा वेळी घाबरलेल्या स्थितीत महिलांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करावे लागतात. खासगी डॉक्टरांचे उपचार हे गरिबांना परवडणारे नाहीत. त्यामुळे अशा महिलांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महिला रुग्णांची संख्या अधिक तुमसर येथील रुग्णालय हे जरी उपजिल्हा रुग्णालय असले, तरी येथील महिला रुग्णांची संख्या लक्षात घेता, महिला रुग्णांची संख्या येथे मोठी आहे. राज्यात इतर उपजिल्हा रुग्णालयापेक्षा येथे अधिक सिझेरियन केल्या जात असल्याची नोंद आहे. त्यामुळे निश्चितच येथे आरोग्य विभागाने किमान तीन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती तत्काळ करण्याची गरज आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या नियुक्तीकडे दुर्लक्ष या रुग्णालयाची आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण आहे. परंतु नियमित स्त्रीरोग तज्ज्ञांची येथे शासनाने नियुक्ती केली नाही. तीन स्त्रीरोग तज्ज्ञ हे इव्हेंट उपक्रमांतर्गत शासनाने नियुक्ती केले आहेत. कंत्राटी अथवा नियमित तीन स्त्रीरोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची गरज आहे. परंतु आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येते.