पोलीस विभागात खळबळ : चोरट्यांचे पोलिसांना आव्हानसिराज शेख मोहाडीमोहगाव देवी येथे रेतीचोरीवर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेली पोलीस चौकीच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ मार्चला उघडकीस आली असून पोलीस याचा कसोसीने तपास करीत आहेत. मात्र या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली असून हे प्रकरण पोलिसांतर्फे गोपणीय ठेवण्यात आले आहे.ज्यांच्यावर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांच्याच चौकीला चोरटे सुरूंग लावत असतील तर जनतेने आपल्या रक्षणाची पोलिसांकडून अपेक्षा तरी कशी करावी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोहगाव देवी येथे हटवार राईस मिल जवळ वरठी पोलीस ठाण्याअंतर्गत रेती चोरीवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने पोलीस चौकी बसविली होती. या चौकीवर नेहमी दोन ते तीन पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. मात्र अनेकदा रात्रीच्या वेळी येथे कर्तव्यावर असलेले पोलीस घरी जावून आराम करायचे असा आरोप आहे. घटनेच्या दिवशी सुद्धा कर्तव्य बजावणारे पोलीस या चौकीवर उपस्थित नसल्यामुळेच चोरट्यांनी आयती संधी साधून चौकीची ताडपत्री, लोखंडी पलंग आदी साहित्य चोरून नेले. जेव्हा सकाळी पोलीस या चौकीवर आले आणि चौकीच गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी शोध घेणे सुरु केले. मात्र अद्यापपर्यंत त्यांना चोरटे गवसलेले नाही. मात्र याबाबत पोलिसांनी कमालिची गुप्तता बाळगली आहे. वादळामुळे चौकी उडाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी लोखंडी पलंग कसा उडाला या प्रश्नावर बोलण्याचे टाळण्यात आले.
पोलीस चौकीच चोरीला जाते तेव्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2016 12:50 AM