जितेंद्र ढोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले.भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी-आवळी दरम्यान चुलबंद नदी दुथडी भरून वाहात आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सोनी येथील शेतकºयांच्या शेतजमिनी आवळी शेतशिवारात तर आवळी येथील शेतकºयांच्या शेतजमिनी इंदोरा येथील शेतशिवारात असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची कामे केली जातात. आवळी या गावाला बेटाचे स्वरूप आले असून, या गावाला चहुबाजूंनी चुलबंद व वैनगंगा नदीने वेढले आहे. येथील गावकरी व शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन कामासाठी डोंग्यातून प्रवास करून नदी पार करावी लागत असते.मागील ५० वर्षांपासून या नदीपात्रातून पुलाच्या कामाची मागणी केली जात असून शासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कित्येकदा या नदी पात्रातुन पुलाचे काम करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. मात्र पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. आवळी येथील गावकरी नेहमीच डोंग्यातून जीवघेणा प्रवास करून आपल्या दैनंदिन गरजा भागवित असतात. सोनी येथील शेतकºयांच्या ३२८ हेक्टर जमिन आवळी शेतशिवारात असून पावसाळी धान रोवणीची कामे जोमाने सुरू असल्याने चिखल करण्यासाठी सोनीवरून आवळीला ट्रॅक्टर नेण्यात आले होते.दरम्यान, गुरूवारला दिवसभरातून नदीपात्रात पाणी वाढल्यामुळे ट्रॅक्टर आवळीमध्येच ठेवण्यात आले होते. सहा दिवस होऊनही नदी पात्रातील पाणी कमी न झाल्यामुळे पलीकडील शेतीची कामे करण्यासाठी गावातील काही धाडसी तरूणांनी रॉकेलचे रिकामे ड्रम एकमेकांना बांधून त्यावर ट्रॅक्टर मांडून बाहेर काढण्याचे ठरविले. आणि गुरूवारला सकाळी गावातील रॉकेल दुकानातील रिकामे २१ ड्रम एकमेकांना बांधून त्यावर ट्रॅक्टर मांडले आणि एक-एक करून सहाही ट्रॅक्टर बाहेर काढले. तरूणांनी घेतलेला हा निर्णय जिवघेणा आणि तितकाच धाडसी असल्यामुळे नदीपात्राच्या दोन्ही बाजूला गावकºयांनी हा प्रकार बघण्यासाठी गर्दी केली होती.या घटनेची माहिती होताच नायब तहसिलदार विजय कावळे, तलाठी कौरवार, पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. धाडसामुळे हे ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले असले तरी हा जीवघेणा प्रवास आमच्या पाचवीला पूजलेला राहणार का? असा संतप्त सवाल सोनी-आवळी येथील ग्रामस्थांनी केला आहे.
दुथडी नदीतून ट्रॅक्टर बाहेर काढतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:43 AM
मागील पाच दशकांपासून पुलाची मागणी होत असलेल्या सोनी-आवळी नदी पात्रात अचानकपणे पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलिकडच्या आवळी येथे सात दिवसांपासून अडकलेले सहा ट्रॅक्टर रॉकेलच्या रिकाम्या २१ ड्रमवर मांडून चक्क दुथडी नदी पार करण्यात आले.
ठळक मुद्देजीवघेणे धाडस : भंडारा जिल्ह्यातील सोनी-आवळी नदी पात्रातील प्रकार