जिल्ह्यात अल्प, अत्यल्प खातेधारक शेतकरी वर्गाची संख्या मोठी असून, अधिक प्रमाणात हलक्या जातीच्या धानाची लागवड करतात. तो विक्रीसाठी नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. ५० टक्के शेतकरी उच्च प्रतीच्या धानाचे उत्पादन घेतात. तो डिसेंबर महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होतो. शासनाने आधारभूत किमतीसह प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केल्याबद्दल डिजिटल बॅनरच्या माध्यमातून मोठा गाजावाजा केला.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी झालेल्या उत्पादनातून बारमाही खावटी योग्य धानाची पिसाई करून उर्वरित धान विकतो. प्रत्येक गावचे उत्पादन व पैसेवारीचा विचार केल्यास मार्च महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात धान खरेदी सुरू होती. ती खरेदी तालुक्यातील सरासरी उत्पादनाच्या व आणेवारीच्या क्षमतेबाहेर झाली. व्यापारी व खरेदी केंद्राच्या संचालक मंडळाच्या संगनमतातून जवळच्या छत्तीसगड, मध्य प्रदेश राज्यांतून मोठ्या प्रमाणात धान खरेदी करून खरेदी केंद्रांवर सातबाराची जुळवाजुळव करून व्यवहार केलेत. आज खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमणाने जोर धरला आहे. गोरगरीब शेतकरी आपला जीव वाचविण्यासाठी रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. गरीब शेतकरी बांधवांकडे आज पैसा नाही व धान विक्रीच्या बोनसची रक्कम शासनाकडे प्रलंबित आहे. मेहनतीचा पैसा स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या उपचारासाठी कामी पडत नसल्याने तसेच खासगी सावकाराकडून कर्ज काढून उपचार करावा लागत असल्याने शेतकऱ्यांत असंतोषाची भावना आहे. शासन - प्रशासनाने अविलंब कार्यवाही करून बोनसची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.