लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूलबस व स्कूल व्हॅनमध्ये जीपीएस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना पोलिस विभाग व शिक्षण विभाग यांनी दिल्या होत्या. त्यानुसार प्रायोगिक स्तरावर ' सीबीएसई' च्या काही शाळांमधील बसमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित झाली; परंतु आजही जवळपास अर्ध्या स्कूल बसमध्ये ही यंत्रणाच नसल्याचे वास्तव आहे.
बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नव्या उपाययोजना जाहीर केल्या. एका महिन्यात सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश दिले, अन्यथा अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा सरकारने दिला.
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्कूलबस व स्कूल व्हॅनमधील सीसीटीव्ही बसविण्याची मागणी पालकांकडून होऊ घातली आहे. शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या उद्देशातून स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जीपीएस प्रणाली बंधनकारक करण्यात यावी आणि ही उपकरणे कायम चालू स्थितीत असावीत, सीसीटीव्ही कॅमेरेमुळे पालकांच्या मोबाइलवर बसच्या आतील चित्रीकरण व फोटो दिसणे शक्य होईल बसमधील व्हिडीओ ऑफलाइन पाहू शकतील.
शिवाय, जीपीएस प्रणालीमुळे स्कूलबस नेमकी कुठे आहे, तिचा वेग किती आहे याची माहिती मिळणेही शक्य होणार असल्याने अनुचित प्रकाराला आळा बसेल. याच दरम्यान झालेल्या बैठकीत तातडीने ही यंत्रणा सर्व बसमध्ये लावण्याच्या सूचना दिल्या; परंतु मोजक्याच सीबीएसई शाळांच्या बसेसमध्ये ही यंत्रणा लागली. नंतर हा विषय दुर्लक्षितच राहिला. पालकांनी कोणाच्या विश्वासावर मुले सोपवायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑटो आणि व्हॅनमध्ये कॅमेरेच नाहीत साकोली येथे शाळा व कॉन्व्हेंटमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करणाऱ्या ऑटो व व्यायाम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीत ही वाहने दररोज पोलिसांच्या समोरून विद्यार्थ्यांची ने-आण करतात मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे.