हिरालाल नागपुरे यांची मुख्य मंत्र्यांकडे मागणी
तुमसर : तुमसर तालुक्यात रोजगार हमीच्या कामांची अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. कोरोना काळात गरिबांच्या हाताला काम नाही. मागील वर्षी या मजुरांना कमी प्रमाणात कामे उपलब्ध झाली होती. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाने तत्काळ रोजगार हमी कामांना मंजुरी प्रदान करण्याची मागणी पं. स. सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मार्च महिन्याचे १५ दिवस लोटले; परंतु रोजगार हमी कामांचे नियोजन अजूनपर्यंत दिसत नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मजुरांच्या हाताला गावात कामे नाहीत. त्यामुळे ग्रामीण मजुरावर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. मागील वर्षीसुद्धा मजुरांना पाहिजे तशी कामे उपलब्ध झाली नव्हती यामुळे जीवन कसे जगावे असा प्रश्न मजुरांसमोर उभा आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच रोजगार हमी कामांचे नियोजन करण्यात येत होते. सध्या कामांची नितांत गरज आहे. अनेक मजुरांनी शहरातून गावांमध्ये पलायन केले आहे. त्यांच्यावर सध्या बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. शासनाने किमान नव्वद दिवस नियमानुसार बेरोजगार ग्रामीण मजुरांना काम उपलब्ध करून देण्याची गरज आहे. ग्रामीण मजूर कामाकरिता वणवण भटकत आहे त्यांची भटकंती थांबावी व त्यांच्या हाताला गावांमध्येच कामे मिळावेत अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.