शेतात काबाडकष्ट करून शेतकरी शेती करतात, कोरोना संसर्ग काळात देखील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत काम थांबविले नव्हते. खरीप हंगामात नोव्हेंबर महिन्यात धान पीक निघाल्यावर शासकीय आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली, त्याचे चुकारे मिळाले, आता दुसऱ्या खरीप हंगामातील अनेकांचे रोप लावून झाले, पण बोनस मिळाला नाही. यावर्षी शासकीय हमीभाव १८६८ रुपये आहे आणि बोनस ५०० रुपये मिळाल्यास २५६८ रुपये धानाचा भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना एक दिलासा मिळणार आहे. सध्या चौरास भागातील शेतकरी शेतीच्या हंगामात गुंतला आहे. दररोज सकाळी आपले संपूर्ण कुटुंब घेऊन शेतात काबाडकष्ट करतो आहे.
सर्व गोष्टीच्या किमती वाढल्याने यावर्षी शेतकऱ्यांची कसरत होत आहे. बी-बियाणे, खत, ट्रॅक्टर भाडे प्रचंड वाढले आहे. तेव्हा तो खर्च कसा करावा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या पाऊस चांगला पडत आहे. तेव्हा येत्या दहा दिवसांत चौरास भागात धानाची रोवणी सुरू होण्याची शक्यता आहे. यावर्षी रोवणी मजुरी प्रचंड वाढणार आहे. आतापासूनच पैशाची जमवाजमव शेतकरी करीत आहेत. शेतकरी बांधवांना राज्य सरकारने बोनस त्वरित देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.