१५ लोक ०९ के
रंजित चिंचखेडे
चुल्हाड (सिहोरा) : महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे नादुरुस्त पंप तीन वर्षांपासून नागपुरात धूळखात पडले असताना गेल्या अनेक वर्षांपासून एकाच कंत्राटदाराला पंपगृहाचे कंत्राट देण्यात येत असल्याचा संतापजनक प्रकार निदर्शनास आलेला आहे. चांदपूर जलाशयात पाण्याची गरज असल्याने तीन पंप कधी परतणार, असा सवाल युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे. कंत्राटदाराच्या निविदा रद्द करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून जबाबदार अधिकाऱ्यांना जॉब विचारले जाणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिली आहे.
चांदपूर जलाशयात पाण्याचा उपसा करण्यासाठी बावणथडी नदीवर महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प ११० कोटी रुपये खर्चून साकारण्यात आलेला आहे. या प्रकल्पात पंपगृह विभाग महत्त्वपूर्ण आहे. पंपाने नदीपात्रातून पाण्याचा उपसा केल्यानंतर चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे ९ पंप प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी तयार असणे गरजेचे आहे. पावसाळ्याचे तीन महिने नदीपात्रातून प्रकल्प पाण्याचा उपसा करीत आहे.
अनेक वर्षांपासून प्रकल्प स्थळातील तीन पंप नादुरुस्त आहेत. हे पंप दुरुस्तीसाठी नागपुरात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून नादुरुस्त पंपांची दुरुस्ती झाली नाही. यामुळे ४ पंपांनी पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. निविदा प्रकाश मेश्राम या एकाच कंत्राटदाराला पंप दुरुस्तीत हयगय करीत असताना कंत्राट दिले जात आहे. संपूर्ण पंप तयार नसल्याने पाण्याचा उपसा प्रभावित होत आहे. जे पंप सुरू आहेत, त्यांची स्थिती ठाकठीक नाही. कधी बंद होतील सांगता येत नाही. ऑगस्ट महिन्यात चांदपूर जलाशय ओव्हरफ्लो होत असताना ३० फूट पाण्यावर अडकले आहे.
सोंड्याटोला प्रकल्पातील समस्या निकाली काढण्यासाठी शासन निधी उपलब्ध करीत आहे; परंतु निविदा घेणारे कंत्राटदार निधी घशात घालत आहेत. त्यांना यंत्रणा सहभागी करीत आहेत. सर्व कामे कंत्राट पद्धतीने करण्यात येत आहेत. नादुरुस्त पंप तत्काळ प्रकल्प स्थळात आणण्यासाठी युवक काँग्रेस आंदोलन करणार आहे. सिंचनाच्या बाबतीत शासन गंभीर असताना निविदा कंत्राटदार व जबाबदार अधिकारी यांच्यामुळे चुकीचे संदेश जनसामान्यांत जात आहेत.
बॉक्स
शेतकऱ्यांकडे अडीच कोटींची थकबाकी
चांदपूर जलाशयाची सिंचन क्षमता १४ हजार हेक्टर आहे. ही सिंचन क्षमता खरीप हंगामातील असली तरी उन्हाळी हंगामात ४ हजार हेक्टर शेती ओलिताखाली आणली जात आहे. स्वस्त दरात पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध केले जात आहे; परंतु पाणसारा वसुलीसाठी मनुष्यबळ नसल्याने पाटबंधारे विभागाचा शेतकऱ्यांकडे असणारा थकबाकीचा आकडा फुगतच आहे. अडीच कोटींच्या घरात थकबाकी शिल्लक असल्याने पाणी वापर संस्थांच्या निर्मितीवर अधिक भर दिले जात आहे.