भंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथे यावर्षापासून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीपासूनच समस्यांच्या विळख्यात धान खरेदी केंद्र राहिले. या केंद्रावर खरिपासह रब्बी हंगामातील धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत या धानाची उचल केली नसल्याने धान उघड्यावर आहे. या धानाची उचल कधी होणार, असा सवाल शेरा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सहकारी संस्था खुटसावरीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
भंडारा जिल्हा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उन्हाळी धान निघून सहा महिन्यांचा काळ लोटूनही शासनाने शेतकऱ्यांच्या धानाची उचल केली नाही. शेतकरी धान खरेदी केंद्र सुरळीत होण्याची वाट बघत आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य शासनाकडून विलंब झाला. केंद्र सुरू झाल्यावर समस्यांचा डोंगर मात्र शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला. केंद्र सुरू होताच बारदान नसल्यामुळे खुटसावरी येथील केंद्र बंद पडले होते. त्यानंतर काही प्रमाणात बारदान उपलब्ध झाले. अत्यल्प बारदानातून शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर धान खरेदी करताना मुदतवाढ दिली. परंतु इतर समस्या सोडविल्या नाही. धानाच्या गुदामांची कमतरता लक्षात घेता खुटसावरी, टेकेपार, पुरकाबोडी येथे धान खरेदी करण्यात आली. मात्र अद्यापही खरिपासह रबी धानाची उचल करण्यात आली नाही. परिणामी धान उघड्यावर असून, ते सडण्याच्या मार्गावर आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याने उघड्यावर असलेले धान्य सडण्याच्या मार्गावर आहेत. धानाची उचल करण्याची मागणी शेरा सुशिक्षित बेरोजगार बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष शेषराव शेंडे, संचालक अनिल गायधने, राजेश सार्वे, दिगांबर गाढवे, बंडू थोटे, शीतल शेंडे, अंजली वासनिक आदींनी केली.
खुटसावरी केंद्रातील धान उचलण्यास दुजाभाव
भंडारा तालुक्यात असलेल्या काही केंद्रातील धानाची उचल करण्यात आली. मात्र खुटसावरी येथील धान उचल करण्यास दुजाभाव केला जात आहे. हेतुपुरस्सर समस्या निर्माण तर केल्या जात नाहीत ना असा सवाल आपसूकच निर्माण होत आहे. येथील केंद्राचे उद्घाटन २६ जानेवारीला मोठ्या थाटात आमदार भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. रबी धानाची उचल दूरच खरिपाच्या धानाची उचल न होणे त्याला काय समजावे?
खुटसावरी येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर विविध समस्यांचा सामना करावा लागला. खुटसावरी, टेकेपार येथे खरिपातील खरेदी केलेला धान उघड्यावर असल्याने चिंता वाटते.
-शेषराव शेंडे, अध्यक्ष