तुमसर : तुमसर तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेचा निधी अजूनपर्यंत लाभार्थ्यांना मिळाला नाही. त्यामुळे घरकूल बांधकाम रखडले आहे. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीचे मस्टर पेमेंट घरकूल लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची परवड होत आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका हा क्षेत्रफळ व लोकसंख्येत मोठा आहे. येथे पंतप्रधान आवास योजनेचा निधी लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मिळाला नाही. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी कामाचे मस्टर पेमेंट सुद्धा घरकूल लाभार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यात असंतोष आहे. घरकूल कसे पूर्ण करावे असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर उपस्थित होत आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. तालुक्यातील लाभार्थी पंचायत समिती कार्यालयात येऊन निधी केव्हा मिळेल, अशी विचारणा करतात. परंतु त्यांना आल्या पावली परत जावे लागते. शासनाकडून त्यांना अजूनपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही. हा निधी कधी उपलब्ध होणार या विवंचनेत येथील लाभार्थी आहेत.
यासंदर्भात छावा संग्राम परिषदेने खंडविकास अधिकारी यांना निवेदन देऊन पंतप्रधान आवास योजनेचा निधी व महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे मस्टर पेमेंट तात्काळ घरकूल लाभार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, बालकदास ठवकर, विजय चौधरी, नीलकमल पारधी, दिनेश उचीबगले, प्रफुल वराडे यांचा समावेश होता.