लोकमत न्यूज नेटवर्क, भंडारा: पंतप्रधान देशातील बेराेजगारी, महागाई, शेतकरी युवकांच्या प्रश्नांवर बाेलत नाहीत, त्याऐवजी धर्म, हिंदू-मुस्लीम जातीय तेढ वाढेल असेच बाेलतात, देशात ओबीसींची संख्या माेठी आहे, मात्र त्यांची भागीदारी कुठेच दिसत नाही. आमचे सरकार आल्यावर सर्वच जातींचे आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करून विविध वर्गांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात भागीदारी मिळेल, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
महाआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची शनिवारी महाराष्ट्रातील पहिली प्रचार सभा जनतेच्या प्रतिसादाने यशस्वी ठरली. गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या सभेत जनतेचा उत्साह ओसंडून वाहत होता. सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
धर्माच्या नावावर विभागले जाते - थोरातराज्याचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात ज्या वेळी लोकशाही, राज्यघटना आणि जनतेचा विचार अडचणीत आला त्या प्रत्येक वेळी विदर्भातील जनता भक्कमपणे पाठीशी उभी राहिली आहे. आज तीच वेळ आहे. मोदी सरकारने भेदाभेद करून धर्माच्या नावावर माणसांना विभागण्याचे काम केले.
घोषणापत्रात सर्वांना न्याय - पटोलेकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पक्षाने आणलेल्या घोषणापत्रात सर्वांना न्याय, जनतेची भागिदारीचे वचन दिले आहे. या देशातील जंगल, जल, जमिनीवर जनतेचा हक्क आहे, अदानींचा नाही. जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणाचा मुद्दा घेतल्याबद्दल त्यांनी जनतेच्या वतीने राहुल गांधी यांचे आभार मानले.
जनतेला वाचवा - पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मोदी सरकारने केलेल्या सर्व घोषणा जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. या देशाने १० वर्षात घेतलेल्या अनुभवातून पुन्हा जुने दिवस आणले पाहिजे आणि भरडलेल्या जनतेला वाचविले पाहिजे ही भावना देशभर जागृत झाली आहे. मोदी सरकारच्या काळात देशात १ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. रोज सरासरी ३० शेतकरी आत्महत्या करतात.
भीती का वाटते? - वडेट्टीवारविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, मोदी सरकार गरिबांचे नसून जुमलेबाज आणि लुटारूंचे आहे. सोन्यावर ३ टक्के, हिऱ्यावर २ टक्के जीएसटी लावणारे हे सरकार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर १८ टक्के जीएसटी लावत आहे. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’ म्हणत जनतेच्या मनात विश्वास पेरला. हा देश गांधींनीच बनविला आणि उभा केला. त्यामुळे आता गांधी नावाची भीती मोदींना वाटत आहे.