लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरभरून साथ दिलेल्या भंडारा जिल्हावासियांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पुरते लोळविले. तत्कालीन सरकारने विकासकामे न केल्यामुळे त्यांना जसा धडा शिकविला तसाच धडा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला शिकवून मतदारांनी आम्हीचे ‘राजे’ असल्याचे दाखवून दिले.मागील वेळी जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीमध्ये एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपला यावेळी मतदारांनी अर्ध्यापेक्षाही कमी जागा मिळू दिल्या नाहीत. शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन आतापर्यंत शेतकऱ्यांसह सामान्य जनतेची सहानुभूती मिळविलेल्या नाना पटोले आणि मोदी लाटेवर स्वार होऊन निवडून आलेले चरण वाघमारे, बाळा काशीवार, रामचंद्र अवसरे या आमदारद्वयींना ग्रामीण मतदारांनी चांगलीच धोबीपछाड दिली आहे. हवेत राहू नका, जनतेची कामे करा, असाच संदेश मतदारांनी दिलेला आहे. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी हे पक्षाचे नसून सर्व जनतेचे असल्याची जाणीव विसरून विरोधासाठी विरोध करुन सामान्यांच्या मुलभूत प्रश्नांसाठी ताकद उभी न करता विरोधातच वेळ खर्ची घालत असल्यामुळे भाजपवर ही वेळ आली असल्याची चर्चा भाजपच्याच गोटातून व्यक्त होत आहे.प्रफुल्लभार्इंची जादू राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी सातही तालुक्यात ४८ झंझावती प्रचारसभा घेऊन संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. मागीलवेळी केलेली चूक पुन्हा करु नका, अशी भावनिक साद मतदारांना घातली. मतदारांनीही भाईजींवरच्या प्रेमाला भरभरुन साथ दिली. प्रत्येकच प्रचारसभेत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका करीत ‘अच्छे दिन’ आले कां? असा सवाल विचारून मतदारांशी थेट संवाद साधला. लोकसभेत नाकारल्यानंतरही कुठलाही पक्षनिभिवेश न ठेवता थेट लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्यांना हात घातला. मतदारांची ‘मने’ आणि ‘मते’ जिंकण्यात ते यशस्वी ठरले. राष्ट्रवादीच्या विजयाचे खरे शिल्पकार प्रफुलभाई ठरले असून जनतेने आपले प्रेम हे केवळ भार्इंजीवरच असल्याचे दाखवून दिले आहे. आता त्यांना पक्षातील गटातटाचे राजकारण आणि पक्षातील व्यक्ती वर्चस्वाला आवर घालण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. तरच निष्ठावान कार्यकर्ते न दुरावता पक्षासोबत कायम राहतील, हाच संदेश निकालातून दिसून आला आहे.वाघायेंचा झंझावातया निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेसने कधी नव्हे तेवढे यश मिळविले. माजी आमदार सेवक वाघाये हे काँग्रेसच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. ज्या साकोली विधानसभेचे दोनदा नेतृत्व आणि दोनदा मतदारांनी नाकारल्यानंतर ते पुन्हा जोमाने जनतेत गेले. या विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी व लाखांदूर या तीन तालुक्यात जिल्हा परिषदेचे १८ गट आहेत. त्यापैकी १५ जागांवर निर्विवाद जागा जिंकून आपले नेतृत्व सिद्ध केले. निवडणुकीत आ.विजय वडेट्टीवार यांची रणनीती यशस्वी ठरली. जिल्ह्यात ज्या २० जागा निवडून आलेल्या आहेत त्यात साकोली क्षेत्रातून १५ जागा काँग्रेसच्या वाट्याला मिळाल्या आहेत. उर्वरित पाच जागांमध्ये भंडाऱ्यात तीन तर पवनीत दोन जागा मिळविता आल्या. तुमसर क्षेत्रात ज्या स्वयंघोषित नेत्यांनी ‘पक्षाला यश आले नाही तरी चालेल परंतु, भविष्यात आपल्यासाठी कुणी डोकेदुखी ठरु नये’, या भीतीमुळे तिकीट वाटप करताना अनेकांना डावलले. त्यामुळे तुमसर क्षेत्रात काँग्रेसचा पुरता सफाया झाल्याचे चित्र दिसून आले.
कुठे गेले ‘अच्छे दिन’
By admin | Published: July 07, 2015 12:36 AM