भंडारा : चुलबंद खोऱ्यातील शेतकऱ्यांनी शेतात उभे असलेले मक्याचे पीक रानडुकरांपासून वाचविण्यासाठी अनोखी शक्कल शोधली आहे. शेतामध्ये धसकटासोबत सलूनमधील निरुपयोगी केस जाळून धूर करण्याचा आणि रात्रभर शेतामध्ये भोंगा वाजवून त्यावरून चित्रविचित्र आवाज काढून डुकरांना पळविण्याचा मार्ग शोधून काढला आहे.
या परिसरात नाले व झुडपी जंगल मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे रानडुकरांचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत आहे. शेतामध्ये शिरून रानडुकरे मालाची नासाडी करून पीक फस्त करत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावत आहेत. त्यासाठी शेतकरी नवनवी शक्कल लढवीत आहेत.
पालांदूर व परिसरात मका पिकाचे आणि भाजीपाल्याचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे रानडुकरांचा उपद्रव वाढला असून त्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मक्याचे पीक सात फुटापर्यंत उंच वाढत असल्याने रानडुकरे पिकात शिरून नासाडी करतात. यात नुकसान अधिक होत असल्याने शेतकऱ्यांपुढे समस्या निर्माण झाली आहे.
खर्च केवळ दोन हजार
दुचाकीमध्ये वापरला जाणारा हॉर्न रात्री शेतात मध्यभागी किंवा झाडाला बांधून ठेवला जातो. त्यामधून वेगवेगळे आवाज वाजविले जातात. त्यामुळे पिकात रानडुक्कर येण्याचे टाळतात. फक्त दोन हजार रुपयात हे साध्य करणे शक्य आहे.
कुत्र्याच्या आवाजाने पळतात रानडुकरे
या हॉर्नवरून कुत्र्याचा आवाज सातत्याने वाजविला जातो. पाचशे मीटरपर्यंत आवाज पोहोचतो. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनाही मदत होते. दिवसा तो चार्ज करावा लागतो.
मक्याचे पीक यंदा चांगले असून भावही समाधानकारक आहे; मात्र रानडुकरांचा उपद्रव मोठा आहे. पिकांचे नुकसान टाळण्याकरिता काहीतरी नवे करण्याच्या प्रयोगातून हा उपाय केला आहे. भोंगा लावल्यापासून पिकाकडे डुकरे फिरकली नाही.
- रविशंकर सदाराम हटवार, मका उत्पादक शेतकरी पालांदूर
...