लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/मोहाडी/तुमसर : भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यात पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलावरुन पाणी वाहते. पावसाळ्यात त्या पुलांवरुन ये-जा करण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अशा पुलांवरुन जीवघेणा प्रवास आणखी किती वर्ष करायचा, असा सवाल निर्माण झाला आहे.भंडारा : तालुक्यातील शिंगोरी ते चांदोरी या मार्गावरील पूल पावसाळ्यात जीवघेणा ठरत आहे. पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. नाल्याला पाणी असल्यामुळे येण्याजाण्यासाठी अडचण निर्माण होते. या परिसरातील विद्यार्थी लाखनी, कारधा, भंडारा, धारगाव येथे शिक्षणाकरिता जात असतात. चांदोरी येथील नागरिकांना जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते.शिंगोरी-चांदोरी- मालीपार, पचखेडी, दवडीपार हाच मार्ग आंभोरापर्यंत जातो. एका बाजुला पवनी मार्ग तर एक मार्ग कोका तसेच लाखनीकडे जाण्याकरिता आहे. दूचाकी व चारचाकी वाहन चालक तीन फूट पाण्यामधून मार्ग काढण्याचा मार्ग काढतात. मागील वर्षी शिंगोरीवरुन चांदोरीकडे जात असलेल्या नागपूर येथील महिलेचा नाल्यातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. अनेकदा पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र गुराख्यानी त्यांचे प्राण वाचविले आहे. शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून शिंगोरी-चांदोरी मार्गावरील पुल बांधकाम तातडीने करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष मंगेश हुमणे, सामाजिक कार्यकर्ते जनार्धन निंबार्ते व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.मोहाडी : कुशारी - मोहाडी, रोहणा- दहेगाव, कन्हाळगाव- महालगाव, मोहाडी - चौंडेश्वरी या मार्गावर कमी उंचीचे पुल आहे. पावसाळ्यात या पुलावरुन पाणी वाहत असते यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत असतो. वाहतुकीला खोळंबा होतो. तरीही तालुक्यातील शाळेत येणारे विद्यार्थी या जीवघेणा पुलावरुन प्रवास करतात. पुलाची उंची वाढविण्याची गरज असतांना लोकप्रतिनिधी गप्प आहेत.दोन दिवसाच्या रिपरिपणा-या पावसामुळे कान्हळगाव- पिंपळगाव, कुशारी -मोहाडी या पुलावरुन पाणी वाहत होता. या पुलावरुन विद्यार्थी व अन्य नागरिक जीवघेणी ये-जा करीत होते. पुलावरुन रहदारी करताना अनुचित घटना घडू नये म्हणून मोहाडी पोलीस तैनात झाले होते. पाण्यातून मार्गक्रमण करताना पोलीस मदत करीत होते, असा हा जीवघेणा प्रवास कुठवर करायचा असा सवाल विचारला जात आहे.तुमसर : कर्कापूर- रेंगेपार (पांजरा) रस्त्यावर कमी उंचीच्या पुलावरुन पाण्यामुळे रेंगेपार (पांजरा) या गावांशी संपर्क तुटला आहे. जिल्हा परिषदेच्या ओडीआर रस्ता असून विद्यार्थी व ग्रामस्थांना मोठा फटका बसत आहे. परसवाडा (सिहोरा) येथेही कमी उंचीचा पुलावरुन पाणी वाहत आहे. यासंदर्भात कर्कापूर येथे ग्रामसभेत ठराव घेऊन जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. पुल ऊंच करण्याची मागणी पं.स. सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केली आहे.कर्कापूर गावाजवळ कमी ऊंचीचा पूल असून सतत दोन दिवसापासून पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पुलावरुन ये-जा बंद आहे. रेगेपार (पांजरा) या गावाला जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. रेंगेपार (पांजरा) येथील नागरिकांचा कर्कापूर, हरदोली, सिहोरा या गावांशी संपर्क तुटला आहे. परसवाडा (सि) सिलेगाव रस्त्यावरही कमी ऊंचीचा पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे दोन्ही मार्ग बंद आहेत.कर्कापूर येथील ग्रामसभेत कर्कापूर-रेंगेपार (पांजरा) पूलाची ऊंची वाढविण्याची चर्चा करुन तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. रेंगेपार येथील विद्यार्थी, ग्रामस्थांना याचा फटका बसत आहे. सदर रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत ओडीआर रस्ता आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे.रेंगेपार (पांजरा) गावाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे, अनेक वर्षापासून कर्कापूर गावाजवळील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातो. कमी ऊंची असल्याने पुलावरुन पाणी वाहते. याचा फटका रेंगेपार वासीयांना बसत आहे. जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे.-हिरालाल नागपूरे,सदस्य, पंचायत समिती, तुमसर
पुलांवर जीवघेणा प्रवास कुठवर..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:32 AM
भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यात पावसाळ्यात कमी उंचीच्या पुलावरुन पाणी वाहते. पावसाळ्यात त्या पुलांवरुन ये-जा करण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण होते. अशा पुलांवरुन जीवघेणा प्रवास आणखी किती वर्ष करायचा, असा सवाल निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : भंडारा, मोहाडी, तुमसर तालुक्यातील व्यथा, अरूंद पुलाचा अनेकांना फटका