भंडारा : घरावर असलेले स्लॅबचे छत तोडताना सिमेंटचा टॉवर तोडण्याच्या कामादरम्यान छातीवर छत कोसळल्याने २० वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला. शुभम रमेश पेलने असे या मजुराचे नाव असून ही दुर्घटना जवाहरनगर येथून जवळच असलेल्या सावरी (ता. भंडारा) येथील भीमराव लाडे यांच्या घरी सुरू असलेल्या कामादरम्यान सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास घडली.
शुभमने दोन दिवसांपूर्वी गावातीलच लाडे यांच्याकडून छत तोडण्याचे काम ठेक्याने घेतले होते. रोजच्या प्रमाणे शनिवारी तो सकाळी ९:३० वाजता सुमारास लाडे यांच्या छतावर काम करण्याकरिता आला होता. छतावर सिमेंट काँक्रीटचे तीन पिल्लर (टॉवर) होते. त्याने दोन पिल्लर कसेबसे तोडले. तिसरा पिल्लर तोडत असताना, छतच त्याच्या छातीवर कोसळले. यामुळे जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागिरकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यावेळी शुभम कोसळलेल्या छताखाली अडकलेला दिसला. नागरिकांनी त्याला काढण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्याची प्राणज्योत तिथेच मालवली.या अपघाताची माहिती पोलिसांना कळविल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रेत मलब्याबाहेर बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविले. त्याच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता सावरी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.संसार पडला
शुभमचे नुकतेच दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याला मुलबाळ नाही. आई-वडील, एक भाऊ असे कुटूंब त्याच्या पाठीशी आहे. या घटनेमुळे त्याचा संसार उघड्यावर पडला आहे.स्वप्न अपुरे
तो यापूर्वी इलेक्ट्रिशियनचे काम करायचा. मात्र त्या कामात कमाई नसल्याने मागील तीन महिन्यापासून तो बेलदारीचे काम करायला लागला होता. या व्यवसायासाठी त्याने अलिकडेच दगड-विटा, सिमेंटचा कॉलम फोडण्यासाठी क्रॅकर मशीनही घेतली होती. या व्यवसायातून कुटूंब सावरण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण होण्याआधीच नियतीने डाव साधला.