पिंपळगाव येथील घटना : पतीविरूद्धही गुन्हा दाखल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईभंडारा : जनावरांचा गोठा बांधकाम झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे बिल काढण्यासाठी महिला सरपंचाने १० हजारांची लाच मागितली. ही लाच स्विकारताना सरपंचासह तिच्या पतीलाही रंगेहात आज सोमवारी मोहाडी तालुक्यातील पिंपळगाव (झंझाड) येथे पकडण्यात आले. रायाबाई सयाम असे महिला सरपंचाचे नाव असून तिच्या पतीचे नाव भैय्यालाल आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. माहितीनुसार, पिंपळगाव झंझाड येथे तक्रारदाराचे मामा नन्हु रामरतन गयगये रा. चोरखमारी आणि चित्ररेखा ओमकार कस्तुरे यांना जनावरांचा गोठा बांधण्यासाठी शासनाकडून प्रकरण मंजुर झाले. नियमाप्रमाणे मंजुर झालेल्या कामाचे अंदाजपत्रक व ग्रामपंचायतीची मंजुरी लाभार्थ्यांना आवश्यक असते. त्या हेतूने मंजुर पत्र प्राप्त करून दोघांनीही बांधकाम सुरू केले. गयगये यांनी केलेल्या बांधकामाचे बिल ७१ हजार रूपये तर कस्तुरे यांनी केलेल्या बांधकामाचे बिल ४९ हजार रूपये मंजुर झाले. दोन्ही बिलावर सरपंच रायाबाई सयाम यांची स्वाक्षरी लागत असल्याने दोन्ही बिल घेवून त्यांच्याकडे गेले असता रायाबाई यांनी १० हजार रूपयांची मागणी केली. त्यानंतर सरपंचासह ग्रामसेवक यांनीही स्वाक्षरी करून दोन्ही बिलाचे धनादेश लाभार्थ्यांना दिले. ''तुम्हाला बिल मिळाले आहेत, कबूल केल्याप्रमाणे बिलाचे १० हजार रूपये देण्यात यावे'', अशी मागणी सरपंच व तिचा पती भैय्यालाल याने वारंवार दोघांकडे केली. दोन्ही लाभार्थ्यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. दरम्यान आज सोमवारी सापडा रचून सरपंच रायाबाई सयाम व तिचा पती भैय्यालाल याला १० हजार रूपयांची लाच घेताना पकडण्यात आले. मोहाडी पोलिसात दोघांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी करीत आहे. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, योगेश्वर पारधी, पोलीस हवालदार बाजीराव चिंधालोरे, संजय कुरंजेकर, नायक पोलीस कॉस्टेबल अशोक लुलेकर, गौतम राऊत, सचिन हलमारे, मनोज पंचबुद्धे, अश्विन गोस्वामी, कोमल बनकर, रसिका कंगाले, श्रीकांत हत्तीमारे यांनी सहभाग नोंदविला होता. (प्रतिनिधी)
लाच घेताना महिला सरपंचाला रंगेहात पकडले
By admin | Published: November 01, 2016 12:34 AM