संसार उघड्यावर : इंदुबाईची आर्त हाकराहुल भुतांगे तुमसरकुणीही घरकुलापासून वंचित राहू नये म्हणून प्रधानमंत्र्यांनी घरकुलाचे उद्दिष्ट वाढविले. त्याचबरोबर मानसिक व शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. परंतु वाली उरला नसल्यामुळे त्यांना नेहमी डावलण्यात येते. परिणामी घरकुलाविना उघड्यावरच संसार थाटावा लागत असल्याचे विदारक चित्र तालुक्यातील लोहारा येथे पाहावयास मिळाला. इंदूबाई राऊत असे त्या मनोरुग्ण महिलेचे नाव आहे.तुमसर तालुक्यातील लोहारा पो. जांब येथे गत १५ वर्षापासून मनोरुग्ण इंदूबाई ही मुलगा सलीमसोबत वास्तव्यास आहे. इंदुबाई मनोरुग्ण असल्यामुळे तिचा पती इंदुबाई व सलीमला सोडून खूप वर्षापूर्वी निघून गेला. इकडे इंदूबाई मोलमजुरी करून प्रसंगी भिक्षा मागून जमेल तसे मुलाचे संगोपन केले. मात्र छत्र हिरावल्याने इंदुबाई व तिचा मुलगा सलीमची परिस्थिती हलाखीची बनली. त्यांनी अनेकांना विनवणी केली. मात्र त्याचा फायदा झाला नाही. लोकसभा, विधानसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान नेत्यांनी इंदुबाईला आश्वासन दिले. मात्र इंदूबाईला हक्काचे घरकुल मिळाले नाही. तिने आता उघड्यावरच संसार मांडला आहे. काही दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. इंदुबाईने टाकलेली झोपडी पावसाळ्यात किती दिवस तग धरून राहणार हे सांगणे कठीणच. यापूर्वी लोहारा ग्रामपंचायततर्फे इंदुबाईचे नाव घरकुलाकरिता पाठविण्यात आले. तिला अपात्र ठरविल्या गेले. परंतु केंद्र शासनाने सदर घरकुल योजना कार्यान्वित करण्यासाठी जे दिशानिर्देश दिले आहेत त्यामध्ये विधवा, कठीण परिस्थितीत जीवन जगणाऱ्या महिला, अपंगत्व तसेच सशस्त्र कारवाईत जीव गमावलेल्या सैनिक व पोलिसांना इंदिरा आवास योजनेत घरकुल देताना प्राधान्य देण्याचे निर्देश आहेत. मात्र त्या सर्व सूचनांना केराची टोपली दाखवत असून गरजू लोकांना योजनेचा लाभापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे इंदूबाईसारख्या बऱ्याच लोकांना निवारा नसल्याने उघड्यावरच जीवन जगावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे.
कुणी घर देता का घर !
By admin | Published: June 01, 2016 1:37 AM