लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्रामविकास मंत्रालयाचे पत्र आले. निवडून आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा जीव भांड्यात पडला. आता पुन्हा सत्ता समीकरणे जुळविण्याला वेग आला. मात्र, कुणालाही जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसल्याने कुणाची सत्ता येणार व काेण जिल्हा परिषद अध्यक्ष हाेणार अशा चर्चांना उधाण आले आहे.भंडारा जिल्हा परिषद आणि सात पंचायत समितींची निवडणूक २१ डिसेंबर व १८ जानेवारी अशा दाेन टप्प्यात पार पडली. १९ जानेवारी राेजी ५२ गट आणि १०४ गणांची मतमाेजणी पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस २१, राष्ट्रवादी १३, भाजप १२, शिवसेना एक, बसपा एक आणि चार अपक्ष निवडून आले. मतदारांनी कुणा एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे निवडणूक निकाल लागताच जुळवाजुळव सुरू झाली. सर्वात माेठा पक्ष काँग्रेस असल्याने त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही असे बाेलले जात हाेते. राष्ट्रवादी काँग्रेससाेबत जाईल अशा सर्वांचा अंदाज हाेता आणि आताही आहे. मात्र, नेत्यांनी काेणताही काैल दिला नाही. अशातच सत्ता स्थापनेची अधिसूचना लांबत गेली आणि सत्ता स्थापनेची चर्चा पुन्हा अडगळीत पडली.तब्बल तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गत मंगळवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने पत्र काढले. पंचायत समिती सभापती आरक्षण साेडत काढण्याची सूचना दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग माेकळा झाला.आता पुन्हा सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र सत्ता स्थापन करणार की आणखी नवे समीकरण जन्माला येणार याबाबत चर्चा सुरू आहे.अनेकजण सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांकडे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. आता २२ एप्रिल राेजी पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण साेडत निघाल्यानंतर नेते काय निर्णय घेतात आणि कुणाची सत्ता स्थापन हाेते हे कळणार आहे. तूर्तासतरी केवळ चर्चांना उधाण आले आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काेण विराजमान हाेताे याची उत्सुकता आहे.
२१ महिन्यांचे दीर्घ प्रशासक राज संपुष्टात येणार- जिल्हा परिषदेची मुदत १५ जुलै २०२० राेजी संपली. मात्र त्या काळात काेराेना संसर्ग असल्याने निवडणूक घेणे शक्य नव्हते. परिणामी १६ जुलै राेजी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त झाले. तेव्हापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने मिनी मंत्रालयाच्या कारभार सुरू आहे. १९ जानेवारीला निकाल घाेषित झाल्यानंतरही तब्बल चार महिने सत्ता स्थापनेसाठी प्रतीक्षा करावी लागली. जवळपास २१ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रशासकराज जिल्ह्याचे अनुभवले.
नेत्यांचे माैन अन् इच्छुक अस्वस्थ- तब्बल तीन महिन्यांनंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र नेते अद्यापही माैन आहेत. काेणत्याही पक्षाच्या नेत्याला विचारले तर लवकरच निर्णय हाेईल, असे उत्तर दिले जाते. नेते काहीच बाेलत नसल्याने इच्छुक मात्र अस्वस्थ हाेत आहे. काहींना नेत्यांनी शब्द दिला आहे तर काही स्पर्धेत आहेत. त्यांचा जीव मात्र टांगणीला आहे.