सूर्यवंशी कुटुंब संकटात : मोहरणा येथील आगीत घर जळून खाक लाखांदूर : आधीच गरीबी. त्यात घर जळाले. आगीत संसारोपयोगी वस्तू खाक झाल्या. डोळयासमोर घर जळताना आसवांशिवाय काहीच उरले नाही. आगीमुळे सूर्यवंशी कुटुंबावर अक्षरक्ष: आभाळ कोसळले असून अख्खे कुटुंब रस्त्यावर आले आहे. लाखांदूर तालुक्यातील मोहरणा येथील सूर्यवंशी यांच्या घराला सोमवारला दुपारी अचानक आग लागली. आगीने घरातील जीवनावश्यक वस्तुसह १.८० लाख रोख रक्कम व सात तोळे सोने जळून खाक झाले आहे. हरीदास सूर्यवंशी व त्यांचे तीन भाऊ प्रभाकर सूर्यवंशी, राम सूर्यवंशी, वसंता सूर्यवंशी हे कवेलूच्या घरात राहात होते. या मध्यमवर्गीय कुटुंबांचा वडिलोपार्जित न्हावी व्यवसाय आहे. पोटाची खळगी भरण्याइतपत कोरडवाहू जमिनीत पावसाच्या भरवशावर शेती करतात. दुसऱ्यांच्या शेतात जाऊन मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. पक्के घर बांधायची ऐपत नसल्याने बारीक कवेलूचे घर हेच त्यांचे सर्वस्व होते. भर उन्हात घराने पेट घेतला आणि सूर्यवंशी कुटुंबीयांनी सर्वस्वच गमावले. काही सेंकदातच होत्याचे नव्हते झाले. मागीलवर्षी मुलाचे लग्न झाले होते. लग्नात मिळालेल्या सर्व वस्तू घरातली भांडी, कपडे, कपाट, दिवान, दागिने आगीने गिळंकृत केले. मुलाला सलून व्यवसाय लावून देण्याकरीता कपाटात ठेवलेली १ लाख ८० हजार रूपयांची रोख रक्कम, सात तोळे सोने जळून खाक झाले. अंगावर घातलेले कपडे वगळता, घरातील सर्वच साहित्य जळाले. ग्रामस्थांनी वेळीच धाव घेऊन, आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तालुक्यात अग्निशमन दलाचे वाहन नाही. त्यामुळे वडसा येथून वाहन बोलाविण्यात आले परंतु वाहन येईपर्यंत घराची राखरांगोळी झाली. जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन आर्थिक मदत दिली. तलाठी नागपुरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. तहसीलदार यु.एम. तोडसाम यांनी दोन क्विंटल तांदळाची व्यवस्था करून दिली. नगरपंचायतचे गटनेते रामचंद्र राऊत यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांना नवीन घर उभारता यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अग्निशामक वाहनाची व्यवस्था करावी, अशी मागणी रामचंद्र राऊत यांनी केली.(शहर प्रतिनिधी)
अन् अख्खे कुटंब आले रस्त्यावर!
By admin | Published: April 03, 2017 12:33 AM