जीवितहानी टळली : १० ते १५ लाखाचे नुकसानपवनी : स्थानिक बजरंग वॉर्डातील रहिवासी व व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष नानाजी बावणकर यांचे राहते घरी असलेल्या प्लॉस्टिक पिशव्या बनविण्याच्या लघु उद्योग केंद्रास रात्री २ वाजताचे सुमारास आग लागली. यात घरातील प्रत्येक वस्तु जळून खाक झाली. लागलेल्या आगीमुळे १० ते १५ लक्ष रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घर कुलूपबंद असल्याने जीवितहानी टळली.नानाजी बावनकर हे परिवारासह नागपूर येथील नातेवाईकांकडे स्वागत समारंभासाठी गेलेले असल्याने नागपूर येथे मुक्कामाला होते. घराला कुलूप लावलेले होते. रात्री दोनच्या सुमारास रस्त्याचे बाजूला घर असलेल्या भांडारकर कुटूंबातील महिलेला स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला म्हणून घराच्या दिशेने पाहिले असता आगीच्या ज्वाळा खिडकी व दारातून बाहेर पडत होत्या. तिने कुटूंबियांना जागवून घटनेची माहिती दिली. आरडाओरड केली असता शेजारचे सर्व कुटूंब जागे झाले. लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून तीन तासात आग आटोक्यात आणली. मोटारपंप व बोअरवेलचे पाणी टाकून नागरिकांनी आग विझविली परंतू त्यादरम्यान घरातील सोफा, दिवान, एलसीडी टीव्ही, कपाट व कपाटातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घराचे रस्त्याकडील बाजूचे खोलीत प्लॉस्टिक पिशव्या बारदाना शिवण्याचा लघुउद्योग त्यांचा मुलगा अतुल बावनकर यांनी सुरू केलेला होता. त्यामधील मशीनस व कच्चा माल जळून खाक झाला. आता एवढी जबरदस्त होती की घरात लागलेल्या सिलिंग फॅनचे पाते वितळून वाकलेले आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेवर पोहचून आग आटोक्यात आणण्यास नागरिकांना मदत केली. सुदैवाने आगीच्या ज्वाळा स्वयंपाकगृहापर्यंत पोहचल्या नाही त्यामुळे गॅस सिलिंडर सुरक्षित राहीला त्यामुळे बजूच्या खोलीत झोपलेल्या त्यांचे पुतणे व त्यांचा परिवार सुरक्षित राहिला. (तालुका प्रतिनिधी)न.प. चे अग्निशमन वाहन कुचकामीगेल्या तीन वर्षापासून न.प. ने अग्नीशमन वाहने खरेदी केलेले आहे. त्यावर २० लक्ष रूपये व ते ठेवण्यासाठी बांधलेल्या इमारतीवर ३० लक्ष रूपये खर्च केले. परंतू वाहन चालक नियुक्त न झाल्याने वाहन धुळखात पडलेले आहे. अग्नीशमन वाहनाची आग विझविण्यासाठी मदत होवू शकली नाही. त्यामुळे पवनीकरांनी नगर पालिका प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला आहे. आतातरी पालिका प्रशासनाची झोप उघडणार काय, असा प्रश्न जळालेले घर पाहताना जमलेले नागरिक विचारत होते. बावनकर कुटूंबियावर फार मोठे संकट कोसळले असल्याने शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
अख्खे घर आगीच्या भक्ष्यस्थानी
By admin | Published: May 13, 2016 12:23 AM