लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अलीकडे जेवढा मोठा राग मोठ्या व्यक्तीला येतो, त्याच्या दुपटीने लहान मुलांना येत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे लहान मुलांशी जवळीक साधून त्यांच्याशी प्रेमाने बोलत, कुरवाळत त्याचे म्हणणे ऐकून घेऊन राग शांत करावा, प्रेमाने बोलले नाही तर मुलांच्या मनात राग कायम राहतो. त्यामुळे कधीही लहान मुलांना रागावू नये, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे. आधुनिक जीवन पद्धती लोप पावल्याने त्याचे वितरित परिणाम जाणवत आहेत.
मुलांमध्ये राग वाढण्याची कारणे काय? मोबाइलचा अतिवापर : लहान मूल रडू लागले की, अनेक पालक मुलाच्या हातात हल्ली मोबाइल देतात. यानंतर हा मोबाइल मागितला की मुले रागराग करतात. अशावेळी पालकांनी मोबाइल व इतर वस्तू मुलांच्या हातात देऊ नयेत. मुलांना मैदानात खेळण्यासाठी पुरेशी मोकळीक द्यावी. संयुक्त कुटुंबपद्धतीचा अभाव : नोकरीनिमित्ताने आज अनेक ठिकाणी एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात आली आहे. पती-पत्नी नोकरीला जात असून, लहान मुलांना पाळणाघरात ठेवत आहेत. अशावेळी लहान मुलांची चिडचिड होते व त्यांचा राग वाढणे स्वाभाविकच असते. त्यामुळे लहान मुलांशी प्रेमाने बोलत राहावे.
पालक काय म्हणतात"अलीकडे लहान मुलांना थोडे जरी बोलले तरी राग येतो. रागाच्या भरात दोन-दोन तास अबोला धरत आहेत. अशावेळी लहान मुलांची खूप समजूत काढावी लागते. प्रेमाने चांगले-वाईटाची समजूत द्यावी." - सुरेंद्र मदनकर, भंडारा
"लहान मुले नेहमीच मोबाइलचा हट्ट करीत असतात. मोबाइल दिला नाही की, चिडचिड करतात. मोबाइलसारख्या वस्तू मुलांच्या हातात देऊ नयेत, दिल्या तर त्यांच्याशी मोकळेपणाने बोलावे. त्यांच्या मनातील भावना समजून घ्याव्या." - संजय बोंदरे, मुंडरी.
इतरांचा राग मुलांवर काढू नये..."कोणत्याही गोष्टीवरून रागराग करणे हे योग्य नव्हे. आपल्या मनासारखी गोष्ट झाली नाही की, अनेकजण रागराग करतात. राग आला की, घोटभर पाणी प्यावे व लहान मुलांना प्रेमाने समजावून सांगावे." - डॉ. सहास गजभिये, मानसोपचारतज्ज्ञ, भंडारा
"पालकांनी इतर गोष्टीचा राग लहान मुलांवर काढणे योग्य नाही. लहान मुले ही कोवळ्या मनाची असतात. अशावेळी मुलांना प्रेमाने बोलून त्यांची समजूत काढल्यास मुलांचा रांग शांत होतो." - डॉ. रत्नाकर बांडेबुचे, मानसोपचार तज्ज्ञ, भंडारा