अड्याळ : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने गावागावात लसीकरणाला सुरुवात केली आहे. याचा लाभ देशातील सर्वांना व्हावा यासाठी शासन तथा प्रशासन मिळेल त्या मार्गाचा अवलंब करताना दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ तथा ४५ वर्ष वयावरील सर्वांसाठी लस ग्रामीण रुग्णालय अड्याळ तथा परिसरातील ठिकठिकाणच्या गावात लसीकरणाला सुरुवात झाली खरी; पण लस असतानाही लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. यामुळे आता कुणी लस घेता का लस असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आतापर्यंत काही ठिकाणी लस उपलब्ध होत नाही त्यामुळे तेथील ग्रामस्थ लस पुरवठा होत नाही म्हणून त्रस्त आहेत, तर दुसरीकडे जिथे लस उपलब्ध आहेत तिथे लस घेणारे नाहीत. यामुळे येथील यंत्रणा त्रस्त झाली आहे. आता लसीकरणाशिवाय पर्याय उरला नाही, असे तज्ज्ञ सांगत असतानासुद्धा अड्याळ व परिसरात लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद का? हा चिंतनाचा विषय ठरला आहे. प्रत्येकाने आपली सुरक्षा, आपली जबाबदारी समजून आतातरी पुढे येऊन लसीकरण करावे, असेही यावेळी आवाहन वारंवार करण्यात येत आहे.
ग्रामीण रुग्णालय अड्याळ असो व परिसरातील गावात आजही आतापर्यंत जेवढ्या प्रमाणात लसीकरण व्हायला पाहिजे होते, त्या प्रमाणात झालेली नाही याविषयी आरोग्य अधिकारी व कर्मचारी तथा ग्रामपंचायत प्रशासन गावात एक नाही अनेकदा दवंडी देत आहेत. पण या विषयी ग्रामवासी धास्तावलेल्या अवस्थेत असल्याचे बोलले जात आहे. पण कुठली धास्ती हे अद्यापही स्पष्टपणे कुणीही दिली नाही. फक्त आता एकच उपाय राहिल्याचे बोलले जात आहे तेही स्पष्टपणे नाही. आज आपल्याला भेटत आहे. अड्याळ व परिसरातील ग्रामस्थांनी अफवेवर विश्वास न ठेवता पुढे येऊन लसीकरण करण्यासाठी स्वतः व दुसऱ्यालाही तयार करावे, असेही आवाहन यावेळी करण्यात येत आहे.