भंडारा : जेवण वाढल्यानंतर भात-भाजी असलेल्या ताटात हात धुणे पतीला चांगलेच महागात पडले. भरलेल्या ताटात हात धुतला म्हणून संतापलेल्या पत्नीने चक्क पतीला बांबूच्या काठीने बदडून काढले. ही घटना भंडारा तालुक्यातील उसरागोंदी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून कारधा ठाण्यात पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याची सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे.
राजेंद्र दुधाराम वाढेवे (वय ३६) असे पतीचे नाव असून उमा राजेंद्र वाढवे (३०) असे पत्नीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी पती राजेंद्रने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. पत्नीने ताटात आंबिल, भात, भाजी वाढली. राजेंद्रने ताटातील आंबिल प्राशन केली. मात्र ताटात भात आणि भाजी असताना हात धुतला. अन्न असलेल्या ताटात पतीने हात धुतल्याने उमा संतापली. याबाबत तिने त्याला जाब विचारला. मात्र पतीने वाद सुरू केला. यामुळे आणखी संतापलेल्या उमाने हातात बांबूची काठी घेऊन पतीला बदडायला सुरुवात केली. काठीचा एक जोरदार प्रहार डोक्यावर झाल्याने राजेंद्रचे डोके फुटून रक्त निघू लागले.
हा प्रकार सुरू असताना शेजाऱ्यांची गर्दी झाली होती. यापैकीच कुणीतरी राजेंद्रला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर राजेंद्रने पत्नीविरुद्ध तक्रार देण्यासाठी कारधा ठाणे गाठले. पत्नीविरुद्ध तक्रार, तीही पतीच देत असल्याने काही वेळी पोलीसही अचंबित झाले. मात्र नंतर उमा वाढवे विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास हवालदार थेर करीत आहेत.