साकोली : चारित्र्यावर संशयावरून एका इसमाने कुऱ्हाडीचे वार करून पत्नीचा खून केला. ही घटना साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे सोमवारला घडली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. गीता लालदास उके (४०) असे मृत महिलेचे नाव असून लालदास उके (४५) असे आरोपीचे नाव आहे. ते नागपूर येथील रहिवासी असून बाम्पेवाडा येथे पाहुणे म्हणून ते आले होते.लालदास व गीता हे नागपूर येथे राहत होते. लालदास हा रोडरोलरचा चालक होता. लालदास हा पत्नीवर संशयावरून तिला नेहमीच मारहाण करीत होता. दि.२५ रोजी तो एकटाच बहिणीकडे बाम्पेवाडा येथील आला. दुसऱ्या दिवशी पती पाठोपाठ गीताही दि.२६ ला मुलगी नयना (१६) सोबत बाम्पेवाडा येथे आली. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वजन जेवण करून झोपले व सकाळी उठले मात्र गीता झोपूनच होती. त्यावेळी लालदासने कुऱ्हाडीने गीताच्या मानेवर वार केला. जिवाच्या आकांताने ती जोरजोराने ओरडली. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर लालदास घटनास्थळाहून फरार झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी गीताचा मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत बुरडे, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांनी भेट दिली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)मुले झाली पोरकी४संशयावरून वडिलाने आईचा खून केला. त्यामुळे पित्याला शिक्षा होणार. आता त्यांच्यामागे असलेली मुलगी निकिता (१७) नैना (१५) व मुलगा नानक (१४) यांच्यावरील आईवडिलाचे छत्र हरवले आहे. आता त्यांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.
संशयावरुन पत्नीचा कुऱ्हाडीने खून
By admin | Published: December 29, 2015 2:39 AM