लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सातपुडा पर्वत रांगेत तुमसर, नाकाडोंगरी व लेंडेझरी वनपरिक्षेत्रचा समावेश असून, कृत्रिम पाणवठ्याअभावी वन्यप्राण्यांना नैसर्गिक पाणवठ्यावरच तहान भागवावी लागत आहे. तापत्या उन्हाने नैसर्गिक पाणवठेही तळाला जात असून, वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्रातून बावनथडीचा मुख्य कालवा असून, पाण्याच्या शोधात कालव्यात उतरून वन्यजीव तृष्णा तृप्ती करताना दिसत आहेत. सध्या सूर्य आग ओकत आहे. तापमानाचा विक्रम होत आहे. वन्यप्राण्यांचा जीव पाण्यासाठी व्याकूळ झालेला आहे. तुमसर व नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर परिसरात आहे. सध्या मोजक्या तलावात पाणी उपलब्ध आहे. इतर लहान-मोठे तलाव आटलेले आहेत. अशावेळी वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यात चांदपूर तलाव, पांगडी तलाव व बावनथडी धरण व बावनथडी मुख्य कालवा, बघेडा तलाव आदी मोठे नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. यासाठी वन्यप्राण्यांना अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते. बावनथडीच्या मुख्य कालव्यात पाणी पिण्यासाठी वन्यजीव उतरतात. मात्र, त्यांना पुन्हा वर चढणे कठीण होते. अनेकदा प्राणी पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जातात. कधीकधी त्यांचा प्राणही जातो.वन विभागाने किमान दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे. वन विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपये विविध कामांवर खर्च करतो; परंतु वन्यप्राण्यांसाठी निधी खर्च होताना दिसत नाही.
मध्यप्रदेशातील शिकारी नजर ठेवून
- महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेवर बावनथडी व वैनगंगा नदी वाहते; परंतु या दोन्ही नद्या सध्या कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मध्यप्रदेशातही जातात. उन्हाळ्यात मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या या दोन्ही वनपरिक्षेत्रात नजर ठेवून असतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जिवाला त्यांच्याकडूनही मोठा धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याची गरज आहे.
तुमसर वनपरिक्षेत्रात नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले नाहीत. तशीही या वनपरिक्षेत्रात कृत्रिम पाणवठ्याची गरज नाही. -गोविंद लुचे, वन परिक्षेत्र अधिकारी, तुमसर