लाखनी (भंडारा) : जंगली हत्तीचा कळपाने गोशाळेत तोडफोड करुन रोपवाटिकेत धुडगूस घालत सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत झोपडी उद्ध्वस्त केली. अनेक झाडे मुळासह उखळून टाकली. गत दोन दिवसांपासून हत्तींचा लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी येथे धुमाकूळ सुरू आहे. हत्तीच्या धास्तीने गावकरी रात्र जागून काढत आहेत.
साकोली तालुक्यातील सानगडी परिसरातून हत्तींचा कळप बुधवारी पहाटे लाखनी वनपरिक्षेत्रातील बारडकिन्ही जंगलात दाखल झाला. कोहळी रेंगेपार परिसरातील शेत पिकांचे मोठे नुकसान केले. रात्री आठ वाजतापासून साडे बारापर्यंत या हत्तींनी पुन्हा रेगेंपार कोहळी परिसरात धुमाकूळ घातला. या कळपाने रेंगेपार येथील मंगला कामथे यांच्या शेतशिवारात असलेल्या धान पुंजण्याचे नुकसान केले. धानाचा लावून ठेवलेला पुंजना उद्ध्वस्त केला. यानंतर हत्तींनी आपला मोर्चा सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेत वळविला. तेथे असलेली झोपडी उद्ध्वस्त करून रोपट्यांचे नुकसान केले.
यानंतर हत्तींचा कळप कोहळी रेंगेपार परिसरात असलेल्या गोशाळेत पोहोचला. तेथे धुडगूस घालून ५० पोत्यातील धान फस्त केला. गोशाळेच्या सुरक्षेसाठी लावलेले टीनपत्रे उद्ध्वस्त केले. दरवाजे तोडले. परिसरातील अनेक झाडे मुळासह उखडून फेकली. सुदैवाने गोशाळेत असलेली ६० जनावरे बंदिस्त असल्याने नुकसान झाले नाही. हत्तीच्या कळपाने दहा लाख रुपयांचे नुकसान केल्याचा अंदाज आहे.
दोन दिवसांपासून रेंगेपार कोहळी परिसरात हत्तींचा संचार असल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रात्रभर गावकरी हत्तींच्या भीतीने जागे असतात.
हत्तीला हुसकावण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न
दोन दिवसांपासून रेंगेपार कोहळी येथे तळ ठोकून असलेल्या हत्तीला हुसकावून लावण्यासाठी वनविभागासह गावकऱ्यांचे पथक प्रयत्न करीत आहेत. बुधवारी मध्यरात्री हत्तींचा कळप रेंगेपार कोहळी येथे धुमाकूळ घालून बरडकिन्ही जंगलात निघून गेला. या कळपावर वनविभागाचा वाॅच आहे.
दोन दिवसांपासून जंगली हत्ती रेंगेपार कोहळी परिसरात आहे. गावात हत्ती शिरू नये, म्हणून वनविभागाच्या पथकासह गावकरी पहारा देत आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी.
- विनायक मुंगमोडे, रेंगेपार कोहळी