आमगाव परिसराला लागून कोका अभयारण्य आहे. तेथील वन्यप्राणी गावामध्ये रात्रीच्या वेळेस येऊन जनावरांवर हल्ला चढवित आहे. यामध्ये अनेक जनावर मृत झाले. तसेच काही जनावरांवर हल्ला केल्याने ते जखमी झाले. याबाबत वनविभागाला माहिती दिली जाते. मात्र विभागामार्फत पाहिजे त्या प्रमाणात भरपाई दिली जात नाही. तसेच एखादा पाळीव जनावर जखमी झाला तर त्याच्या औषधोपचारावर पशुपालकांच्या खिशातून पैसा द्यावा लागतो. त्यामुळे वन्य प्राणी नुकसान करीत असल्याने पाळीव प्राणी पाळावे की नको, अशी भावना पशुपालकांमध्ये निर्माण झाली आहे.
अनेकदा घरी बांधलेल्या जनावरांवर बिबट्या हल्ला चढवित असताे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत आहे. मात्र त्याच्या बंदोबस्त केला जात नाही. कोका अभयारण्य वन्यप्राण्यांसाठी राखीव झाल्याने या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांची संख्या वाढलेली आहे .या वन्यप्राण्यांच्या देखरेखीसाठी वनविभागाजवळ मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा फौजफाटा उपलब्ध असताना सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांचे शेतमालाचे व जनावरांचे नुकसान होत आहे. यासाठी कोका अभयारण्य सभोवताल तारांचे कुंपण घालण्याची अनेक दिवसांची मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे.